वाळूज एमआयडीसी हादरली! वेल्डिंग सुरू असलेल्या ऑइल टँकरचा स्फोट; एकाचा पाय निकामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:23 IST2025-10-17T17:22:39+5:302025-10-17T17:23:34+5:30
छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळूज औद्योगिक परिसरात ऑइल टँकरचा भीषण स्फोट

वाळूज एमआयडीसी हादरली! वेल्डिंग सुरू असलेल्या ऑइल टँकरचा स्फोट; एकाचा पाय निकामी
- अमेय पाठक
छत्रपती संभाजीनगर: शहरातील एमआयडीसी वाळूज औद्योगिक वसाहतीत मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका भीषण स्फोटाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. ऑइलच्या टँकरला वेल्डिंगचे काम सुरू असताना हा अपघात घडला, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याचा एक पाय निकामी झाला आहे.
प्लॉट क्रमांक डी-४२ समोर उभ्या असलेल्या ऑइल टँकरवर वेल्डिंगचे काम सुरू होते. काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, तो दूरवर ऐकू गेला. स्फोटानंतर घटनास्थळी क्षणात धुराचे मोठे लोट पसरले. या दुर्घटनेत टँकरजवळ असलेल्या एका हॉटेलचा चालक गंभीर जखमी झाला. त्याचा एक पाय निकामी झाल्याची माहिती आहे. उपस्थित कामगार आणि नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी चालकाला बाहेर काढले आणि त्याला उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण काय?
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, वेल्डिंगचे काम सुरू असताना टँकरमध्ये असलेल्या ऑइलचे ज्वलनशील वायू स्फोटक ठरले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वेल्डिंग करताना सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस आणि एमआयडीसी वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने आग विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या भीषण अपघातामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.