जागो ग्राहकराजा! पेट्रोल, सिलिंडर ते मिठाईसाठी क्वालिटी अन् क्वांटिटीचा धरा सर्वत्र आग्रह
By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 15, 2024 19:04 IST2024-03-15T18:53:45+5:302024-03-15T19:04:02+5:30
आपल्या अधिकाराकडे दुर्लक्ष करीत डोळे झाकून ‘विश्वास’ ठेवत कोणतीही वस्तू खरेदी केली जात आहे.

जागो ग्राहकराजा! पेट्रोल, सिलिंडर ते मिठाईसाठी क्वालिटी अन् क्वांटिटीचा धरा सर्वत्र आग्रह
छत्रपती संभाजीनगर : ‘ग्राहक’ आता बाजारपेठेचा ‘राजा’ बनला आहे. ग्राहक ते राजा, या प्रवासात राजाचा मुकुट परिधान केलेल्या ग्राहकाला मात्र आपल्या ‘अधिकारा’चा विसर पडलेला दिसतो. इतर राज्यांपेक्षा आपण महाग पेट्रोल खरेदी करतो. ते शुद्ध मिळते का, गॅस सिलिंडर घरपोहोच मिळते. पण, त्याचे वजन तपासले जाते का, एवढेच काय दुकानातून खरेदी करतो ती मिठाई कधी बनविली व कधीपर्यंत वापरायची, याच्या तारखेची विचारणादेखील केली जात नसल्याचे आढळून आले. आपल्या अधिकाराकडे दुर्लक्ष करीत डोळे झाकून ‘विश्वास’ ठेवत कोणतीही वस्तू खरेदी केली जात आहे. अखेर ग्राहक आपल्या अधिकाराप्रती जागृत होणार कधी, हा खरा प्रश्न आहे.
पंपावर फिल्टर पेपर आहे, पण जागृती नाही
वाहनात ट्रोल भरताना ते किती शुद्ध आहे हे जाणून घेणे ग्राहकांचा अधिकार आहे. मात्र, या अधिकाराचा वापर ९९.५ टक्के ग्राहक करीत नसल्याचे आढळून आले. पेट्रोल पंपावर फिल्टर पेपर ठेवणे व दररोज ग्राहकांच्या साक्षीने पेट्रोलची शुद्धता तपासणे पंपचालकांना बंधनकारक आहे. आमच्या प्रतिनिधीने महावीर स्तंभ चौकातील पेट्रोल पंपावर चौकशी केली असता तिथे फिल्टर पेपर असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण, फिल्टर पेपर काढून दाखविला नाही. तसेच शहागंज, जाफरगेट, बीड बायपास येथील पंपावरही सांगण्यात आले. पण फिल्टर पेपरवर शुद्धतेची तपासणी करून दाखविली नाही. हर्सूल टी पॉईंट येथील एचपी कंपनीच्या पंपावर कंपनीचे मोबाइल लॅब वाहन आले होते. अधिकारी पेट्रोल, डिझेलची शुद्धता, लिटरचे माप योग्य आहे का, याची तपासणी करीत होते. यामुळे फिल्टर पेपरची मागणी करताच कर्मचाऱ्याने लगेच कार्यालयात जाऊन फिल्टर पेपरचा गठ्ठाच आणला. त्यावर पेट्रोलचा थेंब टाकला असता काही क्षणात डाग गायब झाला. यावरून पेट्रोल शुद्ध असल्याचे स्पष्ट झाले.
फिल्टर पेपरबद्दल ग्राहकांना माहितीच नाही
हर्सूल टी पाॅईंट येथील पेट्रोल पंपावर दीड तासात ७५ पेक्षा अधिक वाहने पेट्रोल भरण्यासाठी आली. मात्र, एकाही वाहनधारकाने पेट्रोल शुद्ध आहे की नाही, याची विचारणा केली नाही. काही ग्राहकांना विचारले असता त्यांना पेट्रोल शुद्धतेची तपासणी करण्यासाठी पंपचालकांकडे फिल्टर पेपर असतो हेच माहीत नव्हते. ग्राहकजागृतीची मोठी आवश्यकता आहे. त्यासाठी पंपचालकांनी फिल्टर पेपर ग्राहकांना उपलब्ध करून दिले पाहिजे, असे एचपी कंपनीच्या मोबाइल लॉबरेटरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिठाई विक्रेते विसरले बेस्ट, बिफोर
ग्राहकांना ताजी मिठाई विकणे हे विक्रेत्यांचे आद्यकर्तव्य आहे. मात्र, अनेकदा शिळी मिठाईसुद्धा ग्राहकांच्या माथी मारली जात होती. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने २०२० मध्ये परिपत्रक काढून मिठाईच्या दुकानात मिठाईच्या ट्रे समोर ‘बेस्ट, बिफोर’ तारीख लिहिण्याचे आदेश दिले होते. मिठाई कधी तयार झाली व कधीपर्यंत ती खाण्यास योग्य आहे, अशी तारीख लिहिणे बंधनकारक होते. ग्राहक दिनाच्यानिमित्ताने आमच्या प्रतिनिधीने शहरातील उस्मानपुरा, मछलीखडक, आविष्कार कॉलनी रोड, टीव्ही सेंटर चौक परिसर येथील काही मिठाई विक्रेत्यांच्या दुकानात पाहणी केली. शहरातील नामांकित मिठाई विक्रेत्यांकडे मिठाईच्या ट्रे समोर ‘बेस्ट, बिफोर’ तारीख लिहिल्याचे आढळून आले, पण काही मिठाईच्या दुकानात बेस्ट, बिफोरची छोटी पाटी तर होती, पण त्यावर तारीख नव्हती, तर काही छोट्या दुकानात मिठाईसमोर बेस्ट, बिफोरची पाटीच नव्हती. विशेष म्हणजे मिठाई विक्रेत्याच्या विश्वासावरच ग्राहक मिठाई खरेदी करीत होते. कोणीही यासंदर्भात मिठाई विक्रेत्याकडे चौकशी करीत नव्हते. मागील ६ महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने कोणत्याही दुकानात तपासणी नसल्याचे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले.
लोडिंग रिक्षात सिलिंडरचा वजनकाटा खराब
घरपोच सिलिंडर देताना ग्राहकांसमोर त्या सिलिंडरचे वजन करून देणे सक्तीचे आहे. मात्र, याचे पालन होत नसल्याचे आढळून आले. आमच्या प्रतिनिधीने इटखेडा, सुधाकरनगर, समर्थनगर, सिडको एन ८, हडको ज्ञानेश्वरनगर या भागात सिलिंडर घेऊन जाणाऱ्या लोडिंग रिक्षाला थांबून चौकशी केली असता. १५ रिक्षांपैकी ९ जणांकडे वजन करण्याची मशीन दिसून आली. त्यातील ३ जणांकडील मशीन खराब होती. १५ दिवसांत एखादा ग्राहक सिलिंडरचे वजन करून दाखवा, असे म्हणतो. मात्र, बहुतांश ग्राहक वजन न करता सिलिंडर घेतात, असे या लोडिंग रिक्षाचालकांनी सांगितले. कंपनीतून वजन करूनच सिलिंडर आणले असणार, आमचा गॅस एजन्सीमालकावर विश्वास आहे, असे ज्ञानेश्वरनगरातील ३ गृहिणींनी सांगितले.