बंगळुरू, अहमदाबादसाठी ‘टेकऑफ’ची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:39 IST2020-10-27T19:38:34+5:302020-10-27T19:39:44+5:30
औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

बंगळुरू, अहमदाबादसाठी ‘टेकऑफ’ची प्रतीक्षा
औरंगाबाद : औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा पूर्ववत सुरू झाली आहे. आता बंगळुरू आणि अहमदाबाद विमानसेवेच्या ‘टेकऑफ’ची औरंगाबादकरांना प्रतीक्षा लागली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी औरंगाबादहून बंगळुरू आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होती. आयटी हब म्हणून बंगळुरूची ओळख आहे. शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरू येथे शिक्षण घेणारे व नोकरी करणाऱ्यांसाठी ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरत होती. उद्योग, व्यापाराच्या दृष्टीने अहमदाबाद विमानसेवा फायदेशीर ठरत होती; परंतु कोरोनामुळे या दोन्ही विमानसेवा ठप्प झाली.
औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा आता पुन्हा एकदा सुरू झाली
आहे. हैदराबादपाठोपाठ आता बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराला दक्षिण भारताबरोबरची कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षा आहे. स्पाईज जेटकडून बंगळुरू, तर ट्रु जेटकडून अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होती. या दोन्ही कंपन्यांकडून औरंगाबादहून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होण्याची सध्या कोणतीही चिन्हे नाहीत; परंतु इंडिगोच्या माध्यमातून या दोन शहरांना लवकरच कनेक्टिव्हिटी मिळण्याची शक्यता आहे. या सेवेमुळे विभागातील अनेकांची सोय होणार आहे.
उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, की मुंबईची सेवा रविवारपासून नियमित झाली आहे. आता रोज दिल्ली, मुंबई, हैदराबादसाठी विमान उपलब्ध झाले आहे. लवकरच बंगळुरू, अहमदाबादसाठीही विमान सुरू होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
९ हजार प्रवाशांचा प्रवास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात औरंगाबादहून ४८९ विमान प्रवाशांची ये-जा झाली होती. त्यानंतर हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत गेली. सप्टेंबरमध्ये महिनाभरात तब्बल ९ हजार ३६३ प्रवाशांनी प्रवास केला.