शाळा इमारतीस उदघाटनाची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 31, 2014 00:29 IST2014-05-30T23:42:36+5:302014-05-31T00:29:59+5:30
कुरूंदा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या इमारतीचे काम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असून १५ दिवसांनी शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही शाळा खुली करून देणे अपेक्षित आहे.
शाळा इमारतीस उदघाटनाची प्रतीक्षा
कुरूंदा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या इमारतीचे काम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असून १५ दिवसांनी शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही शाळा खुली करून देणे अपेक्षित आहे. त्यामुळे अधिकृतपणे उद्घाटन करणे आवश्यक असताना उद्घाटनासाठी शिक्षण विभाग व बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. कुरूंदा येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या इमारत बांधकामाकरिता तत्कालीन जि. प. अध्यक्ष बालासाहेब आटकोरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे तीन कोटी रुपये खर्चून ही इमारत तयार झाली आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, आ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. इमारतीचे काम मार्गी लागल्यास या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचा पहिला प्रारंभाचा धडा स्वत: पालकमंत्री घेणार असल्याचे आश्वासन वर्षाताई गायकवाड यांनी ग्रामस्थ व पालकांना दिले होते; परंतु इमारत मार्गी लागून दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी इमारतीचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न वरिष्ठस्तरावर अद्याप झालेला नाही. येत्या १६ जूनपासून शाळेला प्रारंभ होणार आहे. शाळा सुरू होण्यास १५ दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी नवी इमारत खुली करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणे गरजेचे होते. सध्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता असल्याने उद्घाटन करण्यासाठी २० जूननंतरचा मुहुर्त लागणार आहे. कुरूंद्यातील एकमेव सर्वात मोठी इमारत म्हणून जि.प. शाळेच्या इमारतीकडे पाहिले जात आहे. परभणी जिल्हा असताना ही शाळा अग्रणी होती. हिंगोली स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर शैक्षणिक दृष्टीकोनातून इतर जि.प. शाळांबरोबर या शाळेचाही शैक्षणिक दर्जा घसरला आहे. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या जिल्ह्यामध्ये कोणतेच निकष, शैक्षणिक पॅटर्न न राबविल्यामुळे आजघडीला खासगी संस्थेच्या तुलनेत जि. प. शाळेच्या शैक्षणिक दर्जात मागासलेपणा आहे. (वार्ताहर)कुरूंदा येथील जिल्हा परिषद हायस्कूल इमारत बांधकामासाठी तत्कालीन जि.प. अध्यक्ष बालासाहेब आटकोरे यांनी पुढाकार घेतला होता. साधारणत: तीन कोटी रुपयांचा निधी खर्च करून ही इमारत तयार करण्यात आली आहे. शाळा इमारतीला ३० खोल्या आहेत. त्या दृष्टिकोणातून विद्यार्थीसंख्या नाही. दहावीपर्यंत ही शाळा असली तरी शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी किमान १२ वी पर्यंत जि.प. शाळा सुरू करणे गरजेचे आहे. पूर्वी याच शाळेत १० वीचे परीक्षा केंद्र होते. तेही याच शाळेस बहाल करावे लागणार आहे. त्याशिवाय शाळेतील अनेक वर्षांपासून रिक्त असलेले राजपत्रित मुख्याध्यापकाचे पदही भरावे लागणार आहे. शाळेत सुरू असलेली ई-लर्निंग शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोयीची असल्याने व महागडी सुविधा मोफत असल्यामुळे विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.