२३ उमेदवारांसाठी आज मतदान

By Admin | Updated: June 20, 2014 01:12 IST2014-06-20T01:07:09+5:302014-06-20T01:12:46+5:30

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शुक्रवारी मतदान होत असून, २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

Voting for 23 candidates today | २३ उमेदवारांसाठी आज मतदान

२३ उमेदवारांसाठी आज मतदान

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शुक्रवारी मतदान होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण, महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांसह २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
३ लाख ७९ हजार ९९ मतदार आपला प्रतिनिधी ठरविण्यासाठी उद्या मतदान करणार आहेत. बुधवारी सायंकाळी प्रत्यक्ष प्रचार संपला व गेले महिनाभर यानिमित्ताने उडालेला प्रचाराचा धुराळा शांत झाला. आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान यांनी दौरे केले. शिरीष बोराळकर यांच्या प्रचारात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी आदी नेते मंडळी सहभागी झाली होती.
आठ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांत पसरलेला हा मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांचा जीव मेटाकुटीला आला होता. पत्रे, वृत्तपत्रे, होर्डिंग, दूरचित्रवाहिन्यांसह मेळावे आणि प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. उद्या प्रत्यक्ष मतदान होणार असल्यामुळे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत कसे आणायचे याचे नियोजन करण्यात उमेदवार व त्यांची यंत्रणा कार्यरत होती.
या मतदारसंघात केलेल्या कामाच्या बळावर मतदार आपणास पाठिंबा देतील, असा आत्मविश्वास आ. सतीश चव्हाण यांना असून, आपली पाटी कोरी आहे व काम करण्याची आपली इच्छाशक्ती आहे, असे बोराळकर यांचे म्हणणे आहे. पहिल्या पसंतीची मते आपल्या उमेदवाराला द्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांची एकमेकांत देवाण-घेवाण करू या, असा करार करून एमआयएमचे उमेदवार अ‍ॅड. मुश्ताक अहमद खान आणि बहुजन, मागासवर्गीय प्राध्यापक, अधिकारी, अल्पसंख्याक कर्मचारी महासंघ पुरस्कृत उमेदवार डॉ. शंकर अंभोरे यांनी मतांच्या राजकारणाची नवी खेळी खेळली आहे.

Web Title: Voting for 23 candidates today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.