महापालिका निवडणुकीसाठी मार्च २०२० मधील मतदार यादी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:30 IST2020-12-12T11:47:54+5:302020-12-12T12:30:22+5:30
Aurangabad Municipality Election नवीन मतदारांना निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे

महापालिका निवडणुकीसाठी मार्च २०२० मधील मतदार यादी रद्द
औरंगाबाद : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी आता नव्याने मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे मार्च २०२० मधील मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने रद्द ठरविली आहे. याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी केले आहे.
नवीन मतदारांना निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, निवडणूक आयोगाकडून मतदार यादी कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रकात म्हटले आहे, एप्रिल-मे २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व इतर चार पोटनिवडणुकीसाठी निर्धारित कार्यक्रमानुसार ९ मार्च २०२० रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करुन १६ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. २३ मार्च २०२० रोजी अंतिम यादी प्रसिध्द करायची होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यास स्थगिती देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०२० या पात्रता दिनांकावर विधानसभा मतदार यादी अद्ययावत करुन २५ सप्टेंबर २०२० रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली आहे.