तीसगाव व म्हाडा कॉलनीस जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:00+5:302021-02-05T04:11:00+5:30
वाळूज महानगर : तीसगाव व म्हाडा कॉलनी परिसरात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी (दि.२७) भेट देऊन पाहणी केली. ...

तीसगाव व म्हाडा कॉलनीस जिल्हाधिकाऱ्यांची भेट
वाळूज महानगर : तीसगाव व म्हाडा कॉलनी परिसरात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी (दि.२७) भेट देऊन पाहणी केली. तीसगावच्या शासकीय जागेवर शासनाकडून गृहप्रकल्प उभारला जाणार असल्याने या जागेची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. त्यानंतर म्हाडा कॉलनीत बांधकामावरून नागरिक व लष्कराच्या अधिकाऱ्यांत सुरू असलेल्या वादाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी म्हाडा कॉलनीत भेट देऊन नागरिक, छावणी परिषदेतील लष्कराचे अधिकारी व सिडकोच्या अधिकाऱ्यांची संवाद साधला. ‘म्हाडा’च्यावतीने अडीच दशकांपूर्वी येथे ४५० घरे बांधून या परिसरातील नागरिकांना वाटप केली. आता ही घरे जुनाट झाल्याने नागरिक सिडको प्रशासनाची परवानगी घेऊन नवीन बांधकामे करत आहे. मात्र, लष्कराच्या अधिकाऱ्याकडृन ही जागा लष्कराच्या हद्दीत येत असल्याचा दावा करून नागरिकांना बांधकामे करण्यास मज्जाव केला जात आहे. यासंदर्भात त्रस्त नागरिकांनी ‘म्हाडा’चे सीईओ ए. एन. शिंदे यांची भेट घेऊन तक्रार केली होती.
म्हाडावासीयांनी वाचला तक्रारींचा पाढा
म्हाडा कॉलनीतील बांधकामे लष्कराकडून सतत बंद पाडण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी म्हाडा कॉलनीतील नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले. नागरिकांनी बांधकामे करताना लष्कराचे जवान त्रास देत असल्याचे सांगितले. सिडको व म्हाडा प्रशासनाकडून सहकार्य केले जात असले तरी लष्कराकडून मात्र विनाकारक वेठीस धरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याप्रसंगी सिडकोचे प्रशासक भुजंग गायवाड, भू-मूल्यांकन अधिकारी प्रगती चोंडेकर, मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे, उपजिल्हाधिकारी रोडगे, मंडल अधिकारी लक्ष्मण गाडेकर, तलाठी जाधव, ग्रामविकास अधिकारी ए. आर. गायकवाड आदींसह नागरिकांची संख्येने उपस्थिती होती.
लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार
यासंदर्भात लवकरच बिग्रेडिअर, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यांची जिल्हाधिकारी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे सीईओ ए. ए. शिंदे यांनी दिली.
फोटो ओळ- म्हाडा कॉलनीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी करून नवीन बांधकामासंदर्भात नागरिक व लष्करात सुरू असलेल्या वादाची माहिती जाणून घेतली.
---------------------------