छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट काम करून वर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावणारा अंश इन्फोटेक कंपनीचा उपमहाव्यवस्थापक विशाल एडके याला पोलिसांनी ७ मे रोजी अटक केली होती. मंगळवारी न्यायालयाने त्याचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत दोषाराेपपत्र दाखल होईपर्यंत जिल्ह्यात प्रवेश न करण्याची अट घातली आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेदरम्यान रोड रिस्टोरेशन व पेव्हर ब्लॉकच्या कामाच्या दर्जाच्या मोजमापात मोठी तफावत आढळल्याने एडकेचे काम थांबविण्यात आले होते. जीव्हीपीआर कंपनीतर्फे त्याला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमले होते. हायड्रॉलिक परीक्षणाच्या आधी पाइपलाइन बुजविल्याचे समोर आल्याने प्राधिकरणाने काम थांबवले. त्या रागातून एडकेने स्थानिकांना हाताशी धरून प्राधिकरणाविरोधात तक्रारसत्र सुरू केले. मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांना खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावरून त्याच्यावर ५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
७ मे रोजी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी एडकेला अटक केली. १४ मेपर्यंत तो पोलिस कोठडीत होता. त्यानंतर त्याने ॲड. गोपाल पांडे, व्ही. डी. सपकाळ यांच्यामार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने एडकेचा जामीन सशर्त मंजूर केला. शासनाच्या वतीने ॲड. एस. व्ही. मुंडवाडकर यांनी बाजू मांडली.
या अटी-शर्तीन्यायालयाने एडकेला दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. तपास अधिकाऱ्याने बोलावल्यास हजर राहावे, राहत असलेल्या पत्त्याविषयी पोलिसांना कळवून दर रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत स्थानिक पोलिस ठाण्यात हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.