‘त्या’ गावाच्या नोंदी निरंकच !

By Admin | Updated: May 8, 2014 23:20 IST2014-05-08T23:18:06+5:302014-05-08T23:20:24+5:30

औसा : तालुक्यातील नागरसोगा, जवळगा (पो), दापेगाव व या भागातील अन्य काही गावांना ६ मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह गारपिटीचा तडाखा बसला

The villages' records are not! | ‘त्या’ गावाच्या नोंदी निरंकच !

‘त्या’ गावाच्या नोंदी निरंकच !

औसा : तालुक्यातील नागरसोगा, जवळगा (पो), दापेगाव व या भागातील अन्य काही गावांना ६ मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह गारपिटीचा तडाखा बसला. ही गावे लामजना व मातोळा महसूलअंतर्गत येतात. मात्र सदरील महसूल मंडळात या गारपिटीच्या नोंद निरंक आहे. औसा तालुक्यात ४६ तलाठी सज्जे आणि सात महसूल मंडळे आहेत. १२९ गावांचा विस्तार असलेल्या या तालुक्यात १ लाख २१ हजार ७२० हेक्टर इतके क्षेत्र आहे. बहुतांश क्षेत्र हे निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तालुक्यात मोठ्या नद्या, नाले अथवा सिंचन प्रकल्प नसल्याने पडणार्‍या पावसावरच नागरिकांचे लक्ष असते. महसूल मंडळ असलेल्या गावात पडलेल्या पावसाची नोंद घेतली जाते परंतु महसुल मंडळाअंतर्गत येणार्‍या अन्य गावात पडलेल्या पावसाची नोंद घेतली जात नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ६ मे रोजी नागरसोगा, जवळगा, दापेगावसह विविध गावात गारपीट झाली. काही गावात पावसाचे पाणी वाहिले. काही शिवारावर बंधारे फुटले. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. झाडे उन्मळली. परंतु या प्रकाराची कुठेही नोंद झालेली नाही. नागरसोगा व दापेगाव ही मातोळा महसुलात येतात तर जवळगा पो हे गाव लामजना महसुलात येतात. या दोन्ही महसुलाच्या ठिकाणी ६ मे रोजी झालेल्या पावसाची नोंद मात्र निरंक आहे. याबाबत महसूल विभागातील अव्वल कारकून बालाजी आंब्रे पाटील म्हणाले, आमच्याकडे पावसाची किंवा गारपिटीची कसलीही नोंद झालेली नाही़ (वार्ताहर) यांचे झाले नुकसाऩ़़ दापेगाव येथील शेतकरी सुग्रीव शिंदे यांची अर्धा एकर चिकूची बाग आहे़ गारपिटीचा तडाखा बसल्याने फळांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे़ नागरसोगा येथील शेतकरी अनंत सूर्यवंशी यांची अडीच एकर डाळिंबाची बाग आहे़ ती ऐन फुलोर्‍यात आली असताना वादळी वारे व गारपिटीमुळे या बागेचे नुकसान झाले आहे़ दापेगाव येथील शेतकरी दशरथ मगर यांच्या आंब्याच्या दहा झाडांवरील जवळपास २५ ते ३० हजार तर नागरसोगा येथील भिमाशंकर शिंदे यांच्या शेतातील ५ झाडांवरील १० ते १५ हजार आंब्याचे नुकसान झाले आहे़

Web Title: The villages' records are not!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.