गणेशगिरी महाराजांवर गावकऱ्यांचा हल्ला; लाठ्या-काठ्यांचा वापर, दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 07:14 IST2020-12-27T01:07:27+5:302020-12-27T07:14:33+5:30

मोक्षदा एकादशीच्या मुहूर्तावर निलजगाव (ता.पैठण) येथील गावकरी श्रीराम टेकडीवर दर्शनासाठी आले होते.

Villagers attack Ganeshgiri Maharaj | गणेशगिरी महाराजांवर गावकऱ्यांचा हल्ला; लाठ्या-काठ्यांचा वापर, दगडफेक

गणेशगिरी महाराजांवर गावकऱ्यांचा हल्ला; लाठ्या-काठ्यांचा वापर, दगडफेक

पैठण (औरंगाबाद) : तालुक्यातील मेहरबान तांडा भागातील श्रीराम टेकडीवरील नागा साधू गणेशगिरी महाराज यांच्यावर निलजगाव येथून दिंडी घेऊन गेलेल्या गावकऱ्यांनी शुक्रवारी लाठ्या-काठ्यांचा वापर करत दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला. यात महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांना भक्तांनी शनिवारी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून अद्यापही त्याची कुठलीच नोंद झालेली नाही. 

शुक्रवारी मोक्षदा एकादशीच्या मुहूर्तावर निलजगाव (ता.पैठण) येथील गावकरी श्रीराम टेकडीवर दर्शनासाठी आले होते. दिंडीतील गावकरी व टेकडीवरील गणेशगिरी महाराज (पंच दशनाम जुना आखाडा, उत्तराखंड) यांच्यात बाचाबाची होऊन प्रकरण चिघळले. गावकरी आक्रमक झाल्यानंतर गणेशगिरी महाराज दोन्ही हातात तलवार घेऊन गावकऱ्यांसमोर उभे राहिले. महाराजांनी तलवार काढल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्यावर दुरूनच दगडफेक केली. 

पोलिसांत नोंद नाही

महाराजांनी श्रीराम टेकडीचा केलेला विकास व टेकडीला आलेले तीर्थक्षेत्राचे स्वरूप लक्षात घेता गावकरी वर्षभरापासून कुरापती काढत महाराजांना दमदाटी करत असल्याचे त्यांच्या शिष्यांचे म्हणणे आहे. या प्रकारातूनच शुक्रवारी महाराजांवर हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाबाबत बिडकीन पोलीस ठाणे अनभिज्ञ असून हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ठाण्यात कुठलीच नोंद झाली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Villagers attack Ganeshgiri Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.