विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचाच; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
By बापू सोळुंके | Updated: October 5, 2025 22:38 IST2025-10-05T22:38:08+5:302025-10-05T22:38:08+5:30
ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसचं हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन सुरू

विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचाच; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद गॅजेटिअरनुसार मराठा आरक्षणासाठी असलेला २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी विजय वडेट्टीवार ओबीसीचा मोर्चा काढत आहेत. मात्र, हा मोर्चा खऱ्या अर्थाने ओबीसीचा नसून काँग्रेसचा आहे. ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसचं हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन सुरू आहे, असा आरोप मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे यांनी रविवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, विदर्भ आणि खानदेशातील आमच्या कुणबी बांधवांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडेट्टीवार ओबीसीच्या नावाखाली आपले राजकीय दुकान चालवत आहेत. विदर्भातील मराठा समाज झपका दाखवण्यासाठी सज्ज आहे. बंजारा समाजाचे आरक्षण खाल्ले, असे बोगस आरक्षण खाणाऱ्यांनी आमच्या आरक्षणाबद्दल बोलू नये असा टोला त्यांनी मुंडे बहिण, भावावर केली. परळीची लाभार्थी टोळी आणि येवल्याचा अलिबाबा, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली. छगन भुजबळ यांच्या नादी लागून मराठ्यांवर वार केलात, तर तुमचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होईल, असा इशाराही त्यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि आ. धनंजय मुंडे यांना दिला.
आम्हीही बोगस आरक्षणाच्या विरोधात उतरणार!
मराठा आरक्षणाविरोधात मोर्चा काढणाऱ्या नेत्यांना उद्देशून जरांगे म्हणाले की, १० ऑक्टोबरला तुम्ही मोर्चा काढत आहात. तर आम्हीही बोगस आरक्षण खाणाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरू. १९९४ च्या आरक्षणाच्या जीआरमध्ये ज्या बोगस जाती ओबीसींमध्ये घातल्या, त्यांना बाहेर काढा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कारण, या जाती बॅकवर्ड क्लास मध्ये बसतच नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्याकडे लक्ष द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार!
अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी खरीप हंगामवर केलेला खर्च विचारात घेता सरकारने त्यांच्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. दिवाळीपर्यंत काही केलं नाही, तर राज्यभरातील लोकांना बोलावून मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला.