नसती उठाठेव ! मित्राच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीचे केले चित्रण; दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 18:06 IST2021-10-21T18:00:04+5:302021-10-21T18:06:08+5:30
दोघांनी मोबाईलमध्ये विनापरवानगी गुप्तपणे छायाचित्रण केले.

नसती उठाठेव ! मित्राच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीचे केले चित्रण; दोघांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. रामगडिया यांच्या कोर्टात सुनावणी सुरु असताना गुपचूप मोबाईलमध्ये न्यायालयीन कामकाजाचे छायाचित्रण करताना दोघांना पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयीन कामकाज सुरु असताना निखिल कल्याणराव काळे (वय २८, रा. जय भवानीनगर, मुकुंदवाडी) आणि आदित्य गजानन पळसकर (वय २१, रा. शिवाजीनगर, वार्ड नं. ६, मु्. पो. डोणगाव, ता. मेहकर, जि. बुलडाणा, ह. मु. एन ६ सिडको) यांनी व्हिडीओ शुटिंग केले. बुधवारी दुपारी २.४५ ते ३.३० यादरम्यान कोर्टात सुनावणी सुरू असताना निखिल काळे आणि आदित्य पळसकर यांनी स्वत:कडील मोबाईलमध्ये विनापरवानगी गुप्तपणे छायाचित्रण केले. शासकीय गोपनीयतेचा भंग केला म्हणून सहाय्यक फाैजदार राजपाल जाधव यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला. याशिवाय दोन्ही आरोपींकडून ४५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त केले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करत आहेत.
मित्रासाठी केलेले चित्रीकरण
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात एका माजी नगरसेवकाच्या मुलाविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात माजी नगरसेवक पुत्राला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी घेण्यात येत असताना त्याच्या दोन मित्रांनी हे चित्रीकरण केले. मित्रासाठी केलेले चित्रीकरण त्यांच्या अंगलट आले.