Video: मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले आंदोलक, प्रशासनाची धावपळ
By बापू सोळुंके | Updated: October 26, 2023 13:08 IST2023-10-26T13:05:30+5:302023-10-26T13:08:26+5:30
इमारतीवरून आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

Video: मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले आंदोलक, प्रशासनाची धावपळ
छत्रपती संभाजी नगर : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कालपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू झाले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज गुरुवारी दुपारी मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून अनोखे आंदोलन केले.
पंढरीनाथ गोडसे भारत कदम यांच्यासह चार कार्यकर्ते कलेक्टर ऑफिस इमारतीवर चढून बसले. त्यांनी आरक्षण आमच्या हक्काचे ,नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाही ,घेतल्याशिवाय राहत नाही, मुख्यमंत्री हाय हाय,उपमुख्यमंत्री हाय हाय आहे, मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ,सदावर्ते चे करायचे काय खाली मुंडकं वर पाय ,आधी घोषणा देत आहेत.
मराठा आरक्षणाची मागणी, मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन #MarathaReservation#ChhatrapatiSambhajinagarpic.twitter.com/vEKsn4ywvN
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 26, 2023
अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाचे इमारतीवर आंदोलन सुरू झाल्याची कळताच प्रशासनात खळबळ उडाली आंदोलन सुरू केले आहे.सिटी चौक पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी या फौज पाट्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या .त्यांनी आंदोलकांना खाली येण्याची विनंती केली .आंदोलकांनी मात्र खाली येण्यास नकार देत आम्हाला खाली येण्याचा प्रयत्न बळजबरी केल्यास, आम्ही इमारतीवरून उड्या मारू, असा इशारा दिला यामुळे पोलिसांनाही काही अंतरावर उभे राहावे लागले.