व्हिडिओ कॉलने घात केला! सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त शिक्षकाच्या खात्यातून ९७ हजार उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 20:02 IST2025-09-03T20:01:21+5:302025-09-03T20:02:39+5:30

फसवणूक होत असल्याचे लक्षात आले, मात्र अवघ्या १० मिनिटांत खात्यातून पैसे गेले

Video call kills! Cyber criminals steal Rs 97,000 from retired teacher's account | व्हिडिओ कॉलने घात केला! सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त शिक्षकाच्या खात्यातून ९७ हजार उडवले

व्हिडिओ कॉलने घात केला! सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त शिक्षकाच्या खात्यातून ९७ हजार उडवले

छत्रपती संभाजीनगर : बँक खाते बंद झाल्याचे सांगत ते पूर्ववत करण्याचे कारण देत एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी ९७ हजार ७०० रुपये लंपास केले. सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी दि. १ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

७० वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक पैठण रोड परिसरात वास्तव्यास असतात. २८ ऑगस्ट रोजी त्यांना सायंकाळी ५ वाजता अज्ञात क्रमांकावरून व्हिडिओ कॉल प्राप्त झाला. कॉल करणाऱ्यांकडील बाजू मात्र दिसत नव्हती. कॉलवर त्याने एसबीआय खाते बंद पडल्याचे सांगत पूर्ववत करण्यासाठी संपर्क केल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेत नाव व महत्त्वाची माहिती घेतली. त्यानंतर ऑनलाईन फॉर्मद्वारे प्रक्रिया पार पाडण्यास सांगितले. त्यांनीदेखील सर्व प्रकिया पार पाडली. शेवटी त्याने फोन पेचा पासवर्डदेखील विचारला. मुख्याध्यापकांनी तो देखील सांगितला. मात्र, त्यानंतर शंका आल्याने त्यांनी कॉल कट करून मोबाईल बंद केला.

दहा मिनिटांत पैसे लंपास
आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने मोबाईल बंद केला. मात्र, तोपर्यंत सायबर गुन्हेगारांकडे त्यांची सर्व माहिती गेली होती. १० मिनिटांत तक्रारदाराच्या खात्यातून दोन टप्प्यात ९७ हजार ७०० रुपये लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही बाब कुटुंबाला सांगितली. त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पाेलिसांनी तपास करून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी
-अनोळखी क्रमांकावरून आलेले कॉल/व्हिडीओ कॉल उचलू (रिसिव्ह) नये.
-बँक किंवा मोबाइल कुठल्याही युपीआय ॲपचा पासवर्ड, ओटीपी, पिन कधीही कोणालाही सांगू नये.
-बँकेकडून कधीही ग्राहकांना त्यांच्या खात्याची माहिती, पासवर्ड कॉलवर विचारली जात नाही. त्यामुळे बँकेकडून बोलत असल्याचे कॉल फसवणुकीचे असतात.
-व्हॉट्सॲप, सोशल मीडिया, यूट्यूबवरील कुठल्याच अज्ञात लिंक, फॉर्म किंवा ॲप्स व विशेषत: एपीके फाईलवर क्लिक करू नये.
-बँकेच्या व्यवहारासाठी मोबाइलमध्ये बँकेच्या अधिकृत ॲपचाच वापर करावा.
-संशयास्पद कॉल आल्यास नातेवाइकांना किंवा सायबर हेल्पलाईन १९३० वर कळवावे.
-फसवणूक झाल्यास वेळ न दडवता तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घ्यावी. गेलेले पैसे व बँक खाते गोठवण्यात मदत होते.

ज्येष्ठ नागरिकच लक्ष्य का?
एपीके फाईल, डिजिटल अरेस्ट, बँकेच्या कारणांसारख्या प्रकारात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. स्मार्टफोन वापराबाबत फारशी माहिती नसल्याने त्यांच्याकडून संवेदनशील माहिती पटकन मिळवण्यात सायबर गुन्हेगारांना यश येते. शिवाय, संमोहित करून भीती दाखवल्यानंतरही त्यांचे उद्दिष्ट साध्य होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनीदेखील स्मार्ट फोन वापरत असलेल्या घरातील ज्येष्ठांच्या मोबाइल व त्यांच्या वापरावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
- शिवचरण पांढरे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

Web Title: Video call kills! Cyber criminals steal Rs 97,000 from retired teacher's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.