Video : ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटाने रुग्णवाहिकेचा चुराडा; डॉक्टर व चालक बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 12:27 IST2021-04-09T12:19:35+5:302021-04-09T12:27:48+5:30
Ambulance shattered by explosion of oxygen cylinder in Aurangabad : वाळूजजवळ १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन रुग्णवाहिकेचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

Video : ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटाने रुग्णवाहिकेचा चुराडा; डॉक्टर व चालक बालंबाल बचावले
वाळूज महानगर : इंधन भरण्यासाठी भेंडाळ्याकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ‘१०८’ रुग्णवाहिकेला गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटाने रुग्णवाहिकेचा अक्षरश: चुराडा झाला असून, प्रसंगावधान राखत डॉक्टर व चालकाने रुग्णवाहिकेतून वेळीच उडी मारल्याने दोघे सुदैवाने थोडक्यात बचावले.
गंगापूर तालुक्यातील भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची १०८ रुग्णवाहिका (एमएच१४, सी.एल.०७९३) भेंडाळा येथून इंधन भरण्यासाठी बजाज ऑटोजवळील पेट्रोल पंपाकडे आली. त्यानंतर चालक सचिन गोरखनाथ कराळे (४२) व डॉ. प्रशांत पोपटराव पंडुरे (३९, दोघेही रा. गंगापूर) हे रुग्णवाहिका घेऊन औरंगाबादच्या दिशेने निघाले. वाळूजजवळ सायंकाळी ४.३० च्या सुमारास चालक सचिन कराळे यांना काही तरी जळाल्याचा वास आल्याचे तसेच रुग्णवाहिकेतून धूर निघत असल्याचे दिसले. यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिका उभी केली व डॉक्टर, चालक यांनी रुग्णवाहिकेतून खाली उड्या मारल्या. दरम्यान, क्षणार्धात रुग्णवाहिकेला आगीने वेढल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी या आगीची माहिती वाळूज पोलीस ठाणे व अग्निशमन विभागाला देऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
रुग्णवाहिकेचे टप ५० फुटांपर्यंत उडाले
गरवारे कंपनीच्या अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेची आग विझविण्यास सुरुवात केली. त्याचवेळी रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडर गरम होऊन मोठा स्फोट झाला. यामुळे रुग्णवाहिकेचे टप जवळपास ५० फूट उडाले. या भीषण स्फोटामुळे रुग्णवाहिकेचा अक्षरश: चुराडा झाला. केवळ रुग्णवाहिकेचे अवशेष शिल्लक राहिले. वाळूज अग्निशमन विभाग, बजाज ऑटो व गरवारे कंपनीच्या अग्निशमन वाहनांनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. रुग्णवाहिकेला आग लागल्यानंतर औरंगाबाद-नगर महामार्गावर जवळपास अर्धा तास वाहतुकीची कोंडी होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी वाळूजचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहा. निरीक्षक विनायक शेळके, वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके आदींनी घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी मदत करीत वाहतूक सुरळीत केली.