Video: अनोखे आंदोलन! मुख्यमंत्री जाताच शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडत रस्त्याचे केले शुद्धीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 17:04 IST2022-09-12T17:00:30+5:302022-09-12T17:04:23+5:30
मुख्यमंत्री जाताच 'पन्नास खोके एकदम ओके' घोषणा देत शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत गोमूत्र शिंपडून केला निषेध

Video: अनोखे आंदोलन! मुख्यमंत्री जाताच शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडत रस्त्याचे केले शुद्धीकरण
औरंगाबाद: पैठण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा बिडकीन येथून जाताच शिवसैनिकांनी 'पन्नास खोके एकदम ओके' च्या घोषणा देत रस्त्यावर गोमूत्र शिंपडले. मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी रस्त्याचे गोमूत्राद्वारे शुद्धीकरण केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सुरु आहे.
मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण विधानसभेत आज मुख्यमंत्री सभेसाठी आले आहेत. दुपारी औरंगाबाद विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा बिडकीन मार्गे पैठण कडे निघाला. मुख्यमंत्री शिंदे यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. दरम्यान, बिडकीन येथे कार्यकर्त्यांनी त्यांची लाडूतुला करण्याचे नियोजन केले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी उशीर झाल्याचे सांगत स्वागत स्वीकारून लाडू तुला स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा थेट पैठणकडे रवाना झाला. मात्र, निलजगाव फाटा येथून ताफा जाताच शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे, माजी सरपंच अशोक धर्मे आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी 'पन्नास खोके एकदम ओके' घोषणा देत त्या मार्गावर गोमूत्र शिंपडले. हातात गोमूत्र भरलेल्या बकेट घेऊन जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर सर्वत्र गोमूत्र शिंपडत निषेध केला.
अनोखे आंदोलन, मुख्यमंत्री जाताच शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडत रस्त्याचे केले शुद्धीकरण#EknathShindepic.twitter.com/vX1mv8OD7M
— Lokmat (@lokmat) September 12, 2022
मुख्यमंत्र्यांच्या 'लाडूतुलेत' गोंधळ
बिडकीनमधील शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदेंची लाडू आणि पेढ्यांनी तुला करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण, शिंदेंना नियोजित वेळेत पोहोचला न आल्याने त्यांनी तुला करण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी पाठ फिरवताच तिथे उपस्थित कार्यकर्ते आणि इतर स्थानिक नागरीक मिठाईवर तुटून पडले. यावेळी इतका गोंधळ झाला की, अवघ्या 21 सेकंदात लोकांनी तब्बल 110 किलो लाडू आणि 100 किलो पेढे ध्वस्त केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.