ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती करणार विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:20 IST2025-02-19T11:15:29+5:302025-02-19T11:20:02+5:30
या संमेलनाध्यक्षपदी यापूर्वीच मराठीतील प्रख्यात लोकसंस्कृती अभ्यासक व इतिहासकार डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड घोषित करण्यात आली आहे.

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती करणार विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : शहरातील आमखास मैदानावर २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठीसाहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. परदेशी म्हणाल्या की, या संमेलनाध्यक्षपदी यापूर्वीच मराठीतील प्रख्यात लोकसंस्कृती अभ्यासक व इतिहासकार डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड घोषित करण्यात आली आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक परराज्यातील व अन्य भाषांमधील साहित्यिक असणे हे विद्रोहीचे वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनासाठी डॉ. एजाज अहम, डॉ. उमा चक्रवर्ती, जयंत परमार, डॉ. असगर वजाहत, डॉ. गौहर रजा, रहेमान अब्बास आदी विचारवंत संमेलनाचे उद्घाटक म्हणून लाभले होते. यावेळी संमेलनाचे उद्घाटन उत्तर प्रदेश येथील ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती यांच्या हस्ते होणार आहे.
साहित्यिक कंवल भारती यांचा जन्म उत्तर प्रदेशातील रामपूर येथील दलित- शोषित समाजात झाला. ते ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत, समीक्षक, अनुवादक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावावर ३२ हून अधिक ग्रंथसंपदा आहेत. त्यांनी हिंदी साहित्य जगताची व उत्तर भारतातील ब्राह्मणी संस्कृतीची चिकित्सा करणारे लेखन सातत्याने केले आहे. यानिमित्ताने त्यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे परदेशी यांनी सांगितले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय बालमंच, युवामंचासाठी स्वतंत्र मंच उपलब्ध असेल, असे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला किशोर ढमाले, डॉ. धोंडोपंत मानवतकर, सतीश चकोर, के. ई. हरदास, प्रा. भारत सिरसाट आणि ॲड. वैशाली डोळस, सविता अभ्यंकर आदींची उपस्थिती होती.
मूठभर धान्य आणि एक रुपयाची वर्गणी
प्रा. वैशाली डोळस म्हणाल्या की, विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून एक रुपयाही घेण्यात येत नाही. या संमेलनासाठी विद्यापीठातील विविध विभागांतील लोकांकडे वर्गणी मागितली तेव्हा त्यांनी विद्रोही विचाराधारेला मदत करत नाही असे बोलून पैसे देण्यास नकार दिला. उलट शहरातील विविध वसाहतींमध्ये आम्ही मूठभर धान्य आणि एक रुपया मागितला तेव्हा घराघरांतील प्रत्येक कुटुंबाने आम्हाला मदत दिल्याचे त्यांनी सांगितले.