पंतप्रधान केअर फंडातून औरंगाबादेस आलेले व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 07:41 IST2021-05-11T07:41:06+5:302021-05-11T07:41:38+5:30
किती व्हेंटिलेटर वापरात आहेत, किती बाहेरच्या जिल्ह्यात दिले आहेत, नादुरुस्त किती आहेत, याचा अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सोमवारी ताबडतोब हाती घेतले आहे.

पंतप्रधान केअर फंडातून औरंगाबादेस आलेले व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत आरोप
औरंगाबाद: पंतप्रधान केअर फंडातून औरंगाबाद जिल्ह्यासाठी आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा खळबळजनक आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी केला. त्याला प्रत्युत्तर देत खासदार डॉ. भागवत कराड यांनीही पुराव्यानिशी आरोप करण्याची मागणी केली. दोन्ही खासदारांच्या व्हेंटिलेटरवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांत प्रशासनाची मात्र कोंडी झाली.
किती व्हेंटिलेटर वापरात आहेत, किती बाहेरच्या जिल्ह्यात दिले आहेत, नादुरुस्त किती आहेत, याचा अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सोमवारी ताबडतोब हाती घेतले आहे. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये सोमवारी कोरोना नियंत्रण आणि उपाययोजनांबाबत बैठक झाली.
यावेळी खासदार जलील म्हणाले, पंतप्रधान साहाय्यता निधीतून मिळालेल्या व्हेंटिलेटर्सचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. ते व्हेंटिलेटर नादुरुस्त झाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे आहेत, असे वाटू लागले आहे.
खासदार जलील यांच्या आरोपामुळे संतप्त झालेले भाजप खासदार कराड, आमदार अतुल सावे हे प्रत्युत्तर देताना यावेळी म्हणाले, तंत्रज्ञ बोलावून व्हेंटिलेटर्स तपासण्यात येतील. तसेच केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव राजेशभूषण यांनादेखील याप्रकरणी बोलून व्हेंटिलेटरसाठी असलेली एसओपी मागविलेली आहे.
केंद्राने दिले सुमारे २० कोटींचे व्हेंटिलेटर्स
गेल्यावर्षी केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी १०० व्हेंटिलेटर्स दिले होते. त्यातील ६० हून अधिक व्हेंटिलेटर्स बिघडले होेते, ते प्रशासनाने दुरुस्त करून घेतल्याचा दावा प्रशासन करीत आहे. दुसऱ्या लाटेतही केंद्राकडून जिल्ह्याला पुन्हा १०० व्हेंटिलेटर्स देण्यात आले. त्यातील ५५ व्हेंटिलेटर्स परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्याला देण्यात आले आहेत. १० लाख याप्रमाणे २० कोटींचे हे व्हेंटिलेटर्स आहेत.