औरंगाबाद बाजारपेठेत भाज्यांच्या भावात उतार-चढाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 11:52 IST2018-11-19T11:52:01+5:302018-11-19T11:52:33+5:30
भाजीपाला : भाज्यांची आवक कमी तर कधी जास्त होत राहिल्याने फळभाज्या व पालेभाज्यांच्या भावात उतार-चढाव होत राहिला.

औरंगाबाद बाजारपेठेत भाज्यांच्या भावात उतार-चढाव
मागील आठवड्यात औरंगाबाद बाजारपेठेत कधी भाज्यांची आवक कमी तर कधी जास्त होत राहिल्याने फळभाज्या व पालेभाज्यांच्या भावात उतार-चढाव होत राहिला.
किरकोळ विक्रीत सुरुवातीला मेथीचे भाव १० रुपये गड्डी होते नंतर आवक वाढताच दोन रुपये कमी होऊन ८ रुपयांपर्यंत खाली आले. त्यानंतर पुन्हा आठवड्याच्या शेवटी १० रुपये गड्डी विक्री झाली. अशीच स्थिती पालक, शेपूच्या बाबतीतही बघण्यास मिळाली.
शनिवारी ठोक विक्रीत मेथी ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा तर पालक ९० ते २१० रुपये प्रतिशेकडा विक्री झाला. टोमॅटो ३०० ते ५०० रुपये क्विंटल विक्री होत असताना किरकोळ २० रु. किलो विकला जात आहे.
मागील आठवड्यात इंदोरहून गाजराची आवक वाढली. ६० ते ८० रुपये किलोने गाजर विकला जात आहे. चक्क हिवाळ्यात तोतापरी कैरी विक्रीला आली असून १२० रुपये किलोने विकली जात आहे.