उन्हात थंडाव्यासाठी छत्रपती संभाजीनगरात हैदराबादची लिंबू, पण किंमत १५ रुपयांत एक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:11 IST2025-04-19T13:11:05+5:302025-04-19T13:11:47+5:30
उन्हासोबतच भाजीपाल्याचे दरही वाढले; लिंबू पंधरा रुपयांत एक; गवार पेट्रोलपेक्षाही महाग

उन्हात थंडाव्यासाठी छत्रपती संभाजीनगरात हैदराबादची लिंबू, पण किंमत १५ रुपयांत एक
छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. ४२.४ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. यामुळे शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी गारवा लाभण्यासाठी लिंबू सरबत प्यायले जात आहे. परिणामी, लिंबाचे भाव वधारले असून एक लिंबू खरेदी करण्यासाठी १५ रुपये मोजावे लागत आहेत. त्याचसोबत भाजीपालाही महागला असून गवार खरेदीसाठी पेट्रोलपेक्षाही जास्त किंमत मोजावी लागत आहे.
भाजीपाला व वाढलेले दर
भाजीपाला मार्च (किलो) एप्रिल
लिंबू-- १२० रु--२०० रु
काकडी ४० रु---६० रु
गवार ८० रु---१२० रु
भेंडी ५० रु---६०रु
बिन्स ८० रु---१०० रु
शेवगा ६० रु---८० रु
स्थानिक लिंबू रसाळ
बाजारात आसपासच्या ग्रामीण भागातून व हैदराबादहून लिंबाची आवक होत आहे; पण स्थानिक ग्रामीण भागातून आलेले लिंबू आकाराने मोठे व रसाळ आहेत. यामुळे २०० रुपये किलोने विकत आहेत, तर हैदराबादचे लिंबू आकाराने लहान रस कमी असलेले आहे. यामुळे १२० रुपये किलोने मिळत आहे. यामुळे दोन्ही लिंबांमध्ये किलोमागे ८० रुपयांची तफावत आहे.
मेथी २० रुपये जुडी
मार्च महिन्यात १० रुपये जुडी विक्री होणारी मेथीची भाजी आजघडीला २० रुपये जुडी आहे. सर्वाधिक विक्री होणारी भाजी म्हणजेच मेथीची भाजी. या भाजीचे दर वाढताच बाकीच्या भाज्याही महागल्या आहेत. पालक, शेपू, चुका १५ रुपये जुडी आहे.
गवारला चढला भाव
सध्या पेट्रोल १०५.१८ रुपये प्रतिलिटर विकत आहे. त्या तुलनेत गवार १२० रुपये किलोने विकली जात आहे. म्हणजे पेट्रोलपेक्षा गवार महाग विकली जात आहे. यामुळे शेतकऱ्याला फायदा होत आहे; पण शेतात पाणी नसल्याने उत्पादनाला फटका बसत आहे.
कांदा व बटाट्याला मागणी
उन्हाळा व भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत. लग्नसराईत कांदा व बटाट्याला जास्त मागणी आहे, याशिवाय घरगुतीही मागणी आहेच. कारण कांदा १५ ते २५ रुपये, तर बटाटा ३० रुपये किलोने विकत आहे. लिंबू महाग असले तरी सरबतासाठी आवर्जून खरेदी केले जाते. पहिला पाऊस पडेपर्यंत अशीच परिस्थिती राहील.
- संजय वाघमारे, भाजी विक्रेता.