यावेळेसही होणार का उलटफेर? छत्रपती संभाजीनगरसाठी ‘वंचित’नेही केली उमेदवारांची चाचपणी
By विजय सरवदे | Updated: April 1, 2024 18:26 IST2024-04-01T18:22:02+5:302024-04-01T18:26:15+5:30
बैठकीत समोर आलेल्या इच्छुक उमेदवारांची नावे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आली आहेत

यावेळेसही होणार का उलटफेर? छत्रपती संभाजीनगरसाठी ‘वंचित’नेही केली उमेदवारांची चाचपणी
छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीने रविवारी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली. क्रांती चौक येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जावेद कुरेशी यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. तेव्हा त्यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा आहे; पण एकूण मतदारसंघाचा आवाका व परिस्थिती पाहाता विचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली. त्यानंतर पूर्वचे युवा शहराध्यक्ष अफसर पठाण यांनी माजी नगसेवक अफसर खान यांच्या नावासाठी आग्रह धरला. या बैठकीत मात्र, अफसर खान उपस्थित नव्हते. कन्नडचे तालुकाध्यक्ष देवीदास राठोड यांनी केशवसिंग राठोड यांचे नाव सुचविले. याशिवाय पाच- सहा जणांनीही इच्छा व्यक्त केली.
दरम्यान, आजच्या बैठकीत समोर आलेल्या इच्छुक उमेदवारांची नावे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आली. पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जावेद कुरेशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, मराठवाडा सचिव तय्यब जफर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पूर्व शहराध्यक्ष मतीन पटेल, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, महिला शहराध्यक्षा वंदना नरवडे, जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर, बाबासाहेब वाघ, पी.के. दाभाडे, अजय मगरे, भाऊराव गवई, गणेश खोतकर आदींची उपस्थिती होती.