गोकुळाष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम

By Admin | Updated: August 19, 2014 02:11 IST2014-08-18T00:12:18+5:302014-08-19T02:11:28+5:30

बीड : गोकुळाष्टमीनिमित्ताने बीड जिल्ह्यात रविवारी ठिकठिकाणी विविध अध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाले. यामध्ये धारुर येथे शोभायात्रा काढण्यात आली

Various programs for Gokulashtami | गोकुळाष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम

गोकुळाष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम




बीड : गोकुळाष्टमीनिमित्ताने बीड जिल्ह्यात रविवारी ठिकठिकाणी विविध अध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाले. यामध्ये धारुर येथे शोभायात्रा काढण्यात आली तर बीड येथील राधा-गोविंद मंदिर येथे प्रवचन, भजनसंध्या कार्यक्रम पार पडला. यावेळी बालगोपाळांसह महिला भाविकांची मोठी उपस्थिती होती.
वैद्यनाथाच्या दर्शनासाठी
भाविकांची गर्दी
परळी येथे रविवारी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली होती. गोकुळाष्टमी व सुटीचा दिवस असल्याने लहान मुलांबरोबरच महिला भाविकांची मोठी उपस्थिती होती. सकाळपासूनच दर्शनासाठी रीघ लागली होती. रात्री उशिरापर्यंत दर्शन घेणे सुरू होते. यावेळी ‘हर-हर महादेवा’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग परळी येथे असल्याने वैद्यनाथाच्या दर्शनाला राज्यभरातून भाविक आले होते. रविवारी गोकुळाष्टमी व श्रावण सोमवारच्या अनुषंगाने भाविकांची गर्दी इतर वेळेपेक्षा जास्त होती. दोन लाखांच्या वर भक्तांनी रात्री उशिरापर्यंत वैद्यनाथाचे दर्शन घेतले असल्याचे वैद्यनाथ देवस्थानचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी सांगितले. याबरोबरच मंदिर परिसरात गर्दी झाल्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या मंदिर परिसरात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असल्याने अनुचित प्रकार होत असल्याचे लक्षात येताच पोलीस अथवा वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेवेकरी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.
धारुरमध्ये शोभायात्रा
गोकुळाष्टमीनिमित्त रविवारी धारुर शहरात विहिंपच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शिवाजी चौकात मान्यवर व भक्तांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमा तसेच गोमातेचे पूजन करुन शोभायात्रेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘गोविंदा रे गोपाला’चा जयघोष भाविकांनी केला.
धारुर शहरातील श्रीकृष्ण मंदिर, बालाजी मंदिर, हनुमान मंदिर आदी ठिकाणी श्रीकृष्ण जन्माची तयारी भाविकांनी केली होती. ठिकठिकाणच्या मंदिरांवर रोषणाई करुन श्रीकृष्ण जन्माचे स्वागत केले. आयोजित शोभायात्रेचा शुभारंभ शिवाजी चौकापासून करण्यात आला. कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा सविता शिनगारे, माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, शेषेराव फावडे, लक्ष्मणराव सिरसट, बबनराव फुन्ने, नगरसेवक बालासाहेब जाधव, विनायक ढगे, विठ्ठलराव शिनगारे, माणिकलाल तोष्णीवाल आदींची उपस्थिती होती. शोभायात्रेप्रसंगी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी अध्यात्मिक वेशभूषा धारण करुन देखावे सादर केले. शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत केले. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत देशपांडे, अमर महामुनी, गणेश अवतारी, कृष्णा महाजन, राजेश दुबे, हर्षद पिलाजी, कुणाल शुक्ला, लक्ष्मण शेवते, उमेश कुलकर्णी, बाबा घोडके, राजू मोरे, राहुल सोनटक्के, कुंदन शुक्ला, संदीप चिद्रवार, रोहित निक्ते, भरत शिनगारे, प्रदीप बारस्कर आदींनी परिश्रम घेतले.
राधा-गोविंद मंदिर
बीड येथील राधा-गोविंद मंदिर येथे गोकुळाष्टमीनिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. यामध्ये तीन दिवसीय श्रीकृष्ण कथेचा समावेश आहे.
याबरोबरच भजनसंध्या, कलशपूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, अध्यात्मिक नाटिका, महाभिषेक, छपन्नभोग, महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा राधा-गोविंद मंदिराच्या वतीने घेण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Various programs for Gokulashtami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.