छत्रपती संभाजीनगरहून ८२५ रिकाम्या सीट घेऊन धावली नांदेडला पळवलेली वंदे भारत एक्स्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:43 IST2025-08-29T16:43:04+5:302025-08-29T16:43:20+5:30
नांदेडला पळविलेल्या रेल्वेची पहिली नियमित फेरी; नव्या वेळेच्या संदेशाअभावी प्रवाशांची दमछाक

छत्रपती संभाजीनगरहून ८२५ रिकाम्या सीट घेऊन धावली नांदेडला पळवलेली वंदे भारत एक्स्प्रेस
छत्रपती संभाजीनगर : नांदेडला पळविलेल्या जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची गुरुवारपासून नियमित फेरी सुरू झाली. मात्र, बदललेली वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची झाल्याचे पहिल्याच नियमित फेरीत स्पष्ट झाले. काही मोजकेच प्रवासी छत्रपती संभाजीनगरहून रवाना झाले. तब्बल ८२५ रिकाम्या सीट घेऊन ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून रवाना झाली.
जालन्याहून धावताना ही रेल्वे पूर्वी छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ५:५० वाजता सुटत होती आणि दुपारी ११:५५ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचत होती. आता ही रेल्वे नांदेडला पळविल्यानंतर नव्या वेळापत्रकानुसार छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ८:१५ वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. त्यामुळे सकाळी मुंबईला गेल्यानंतर सायंकाळी रेल्वेने परतणे अशक्य आहे. ‘वंदे भारत’ची अवस्था ‘जनशताब्दी’प्रमाणे होईल आणि प्रवाशांसाठी ती उपयोगी ठरणार नाही. नांदेडहून धावणाऱ्या पहिल्या नियमित फेरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्येही, ही रेल्वे आता गैरसोयीची झाल्याचीच चर्चा सुरू होती. अनेक दिवसांपूर्वी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेची वेळ बदलल्याचे संदेशही आले नाहीत. त्यामुळे अनेक प्रवासी सकाळी ५:५० वाजेपूर्वीच स्टेशनवर दाखल झाले होते. रेल्वे ८:१५ वाजता सुटणार असल्याचे कळताच काही जण परत गेले, तर काही जण स्टेशनवरच थांबले.
मुंबईत मुक्कामाची वेळ
वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेल्याने कनेक्टिव्हिटी वाढली. पण, छत्रपती संभाजीनगरकरांसाठी ही रेल्वे गैरसोयीची झाली आहे. एका दिवसात मुंबईला ये-जा करणे अशक्य होईल. मुंबईत मुक्काम करण्याचीच वेळ येईल. बदललेल्या वेळेचा रेल्वेकडून मेसेज आला नाही. त्यामुळे मी सकाळी ५:५० वाजता स्टेशनवर येऊन परत गेलो.
- अक्षय पाटील, प्रवासी
जास्त पैसे देऊन गैरसोय विकत
वंदे भारत एक्स्प्रेसची वेळ बदलल्याने आता जास्त पैसे देऊन गैरसोय विकत घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे. विविध कामांसाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही रेल्वे आता गैरसोयीची झाली आहे.
- ॲड. सुयश जांगडा, प्रवासी