पहिल्या दिवशी तेराशे कोरोना योद्ध्यांना लस; १३ बूथवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 20:03 IST2021-01-14T20:02:38+5:302021-01-14T20:03:09+5:30
corona vaccine : गेल्या महिनाभरापासून लसीकरणासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर्स, नर्स, इतर कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात आहे.

पहिल्या दिवशी तेराशे कोरोना योद्ध्यांना लस; १३ बूथवर होणार लसीकरण
औरंगाबाद : जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी ग्रामीण भागातील ८ आणि शहरातील ५ बूथवर लसीकरणाचा प्रारंभ होणार आहे. प्रत्येक बूथवर १०० याप्रमाणे या १३ बूथवर पहिल्या दिवशी १३०० कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
गेल्या महिनाभरापासून लसीकरणासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर्स, नर्स, इतर कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात आहे. ग्रामीण भागातील १३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. दौलताबाद, गणोरी, पालोद प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोडमधील उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड, कन्नडमधील ग्रामीण रुग्णालय अशा ८ ठिकाणी पहिल्या दिवशी लसीकरणाला प्रारंभ होईल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ यांनी दिली.
बूथची संख्या केली कमी
पहिल्या दिवशी जिल्ह्यात १८ बूथवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते; परंतु ही संख्या आता १३ करण्यात आली. एका बूथवर एका दिवशी १०० जणांना लस दिली जाणार आहे. १६ जानेवारीनंतर बूथची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. लसीकरणासाठी टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागांत १५० बूथ कार्यान्वित करण्यात येतील.
नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या
- शहरात २० हजार.
- ग्रामीण भागात १३ हजार