उस्मानाबादनगरी भक्तिरसात न्हाली...

By Admin | Updated: June 30, 2014 00:42 IST2014-06-30T00:31:49+5:302014-06-30T00:42:46+5:30

उस्मानाबाद : हाती टाळ-मृदंग, हातात भगवी पताका, मुखी विठुनामाचा जप अन् डोळ्यात विठ्ठल-रूक्मिणी दर्शनाची आस घेवून

Usmanabadangari devotedly devoted ... | उस्मानाबादनगरी भक्तिरसात न्हाली...

उस्मानाबादनगरी भक्तिरसात न्हाली...

उस्मानाबाद : हाती टाळ-मृदंग, हातात भगवी पताका, मुखी विठुनामाचा जप अन् डोळ्यात विठ्ठल-रूक्मिणी दर्शनाची आस घेवून पंढरीकडे निघालेल्या शेगाव येथील गजानन महाराज पालखी, दिंडीचे रविवारी उस्मानाबादकरांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत केले़ पालखीच्या दर्शनासाठी व वारकऱ्यांच्या सेवेसाठी उस्मानाबादकरांनी मोठी गर्दी केली होती़ सकाळपासूनच निर्माण झालेले भक्तिमय वातावरण रात्री उशिरापर्यंतही कायम होते. उस्मानाबादनगरी भक्तिरसात न्हाहून निघाली़ पंढरीच्या विठोबाला पाऊस पडावा आणि बळीराजा सुखी व्हावा, असेच साकडे आम्ही रोज घालत असल्याचे वारकऱ्यांनी सांगितले़
श्री क्षेत्र शेगाव येथील श्रींच्या पालखीचे रविवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबादनगरीत आगमन झाले़ प्रारंभी नगरपालिकेच्या वतीने श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले़ त्यानंतर ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी महामार्गावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती़ शहरातील ज्ञानेश्वर मंदिरात पालखी विसावल्यानंतर तेथे वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले़ अनेक भाविकांनी उत्स्फूर्तपणे सेवेसाठी यावेळी सहभाग नोंदविला होता़ ज्ञानेश्वर मंदिरात पालखीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी एकच गर्दी केली होती़ तेथून पुढे निघालेल्या पालखीचे विविध शासकीय कार्यालयाजवळ स्वागत करून दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती़ शहरातील देशपांडे स्टँन्ड, नेहरू चौक, काळा मारूती चौक मार्गांवरून ही पालखी लेडिज क्लबच्या मैदानावर विसावली़ शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता़
गजराजाविना पहिली दिंडी
श्री क्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दिंडीत गजराज हे प्रमुख आकर्षण असते़ ठिकठिकाणी पालखीसोबत गजराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात़ मात्र, यंदा दिंडीत गजराजाची अनुपस्थिती प्रत्येकाला जाणवत होती़ बहुधा गजराजाविना दिंडी प्रथमच पाहिल्याचे अनेकांनी सांगितले़
११ आदल्यांची सलामी
ज्ञानेश्वर मंदिर परिसरात पानटपरी चालविणारे दयानंद गवाड हे गत अनेक वर्षापासून पालखीचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने करीत आहेत़ यांदाही त्यांनी मित्रांच्या सहकार्याने ११ आदल्यांची सलामी देत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत केले़
अद्ययावत रूग्णवाहिकेची सुविधा
श्री क्षेत्र शेगाव येथून ३३ दिवस तब्बल ७५० किलोमीटरचा प्रवास करीत दिंडीत सहभागी ६५० वारकरी पंढरीकडे जातात़ पालखीचे हे ४७ वे वर्ष असून, ५ जून रोजी निघालेली ही दिंडी २५ व्या दिवशी उस्मानाबादेत मुक्कामी आली आहे़ पालखीतील वारकऱ्यांसठी टँकर, वैद्यकीय सेवेसाठी अ‍ॅम्ब्युलन्सचीही सोय करण्याता आली आहे़ रात्री येथील लेडिज क्लबच्या मैदानावर कीर्तनाचा कार्यक्रम झाला़ यावेळी शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
विधीज्ञ मंडळाकडून पाणी बाटल्या वाटप
श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे शहरात आगमन झाल्यानंतर येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या वतीने अध्यक्ष अ‍ॅड. रंगनाथ लोमटे यांनी स्वागत करून वारकऱ्यांना फराळ तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. यावेळी विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष मारूती घोगरे, अ‍ॅड.अंगद कदम, सचिव अ‍ॅड. सुजीत तीर्थकर, कोषाध्यक्ष अ‍ॅड. सुनील निकम, सहसचिव अ‍ॅड. केदार भोसले, अ‍ॅड. मंगेश वळसंगे, अ‍ॅड. पांडुरंग लोमटे, अ‍ॅड. सराफ, अ‍ॅड.सुंदर बोंदर, अ‍ॅड. नितीन भोसले, अ‍ॅड. संतोष शिंदे, अ‍ॅड. बी. टी. लोमटे, अ‍ॅड. बी. आर. पवार, अ‍ॅड. यादव, अ‍ॅड. राम गरड यांच्यासह आदींची उपस्थित होते.

Web Title: Usmanabadangari devotedly devoted ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.