शेतीत ठिबक सिंचनाचा वापर वाढला
By Admin | Updated: June 26, 2014 00:38 IST2014-06-26T00:23:36+5:302014-06-26T00:38:08+5:30
पालम : शेतीमधील पिके वाचविण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर वाढला आहे़ शेतकऱ्यांमधून ठिबकची मागणी वाढल्याने साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे़

शेतीत ठिबक सिंचनाचा वापर वाढला
पालम : शेतीमधील पिके वाचविण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर वाढला आहे़ शेतकऱ्यांमधून ठिबकची मागणी वाढल्याने साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे़
कापूस पिकासाठी सर्वाधिक वापर करण्यात येत आहे़ मृग नक्षत्राची सुरुवात होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही़ पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़ शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, आकाशाकडे डोळे लावून बसला आहे़ जून महिन्यात पाऊस पडेल हा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी मे महिन्याचा शेवटचा आठवडा व जून महिन्याचा पहिला आठवडा या पंधरवाड्यात कापसाची लागवड केली होती़ पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी हजारो रुपयांची बियाणे खरेदी करत कापूस लागवडीवर भर दिला होता़ लागवड केलेला कापूस चांगल्या स्थितीत आहे़ या कापसाला जोरदार पावसाची गरज आहे़ परंतु, अजूनही पाऊस पडलेला नाही़ यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच संकटात सापडला आहे़ उगवलेले कापसाचे पीक वाचविण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनचा वापर करताना दिसत आहे़ कमी पाण्यावर जास्तीत जास्त कापसाची रोपे जगावीत यासाठी परिश्रम घेतले जात आहेत़ ठिबक सिंचनचा वापर करून कापसाबरोबरच ऊस, केळी व फळबागा जोपासली जात आहेत़ मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ठिबक सिंचनाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे़ शासकीय अनुदानाची वाट न पाहता शेतकरी स्वखर्चातून ठिबक सिंचनची खरेदी करण्यात व्यस्त आहेत़ अचानक ठिबक सिंचनच्या साहित्याची मागणी वाढल्याने साहित्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे़ यामुळे ठिबकच्या साहित्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे़ (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना अनुदान मिळेना
ठिबक सिंचनचे क्षेत्र वाढावे व शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे, यासाठी ठिबक सिंचन करीता शासन शेतकऱ्यांना अनुदान देत आहे़ परंतु, मागील वर्षभरापासून अजूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही़
शेतकरी वर्ग कृषी विभाग व ठिबकच्या व्यापाऱ्यांकडे अनुदानासाठी चकरा मारून बेजार होत आहेत़ शासनाची आॅनलाईन यंत्रणा बंद असल्याने अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला नाही़
निसर्गाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे शासनाने अनुदान न देऊन नवीन संकट उभे केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ पेरणीच्या तोंडावर तरी अनुदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़