छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
By सुमेध उघडे | Updated: April 22, 2025 15:35 IST2025-04-22T15:29:49+5:302025-04-22T15:35:25+5:30
UPSC Result 2025: “निराश न होता सातत्य ठेवणं आणि प्रत्येक चुकांमधून शिकत पुढे जाणं हेच यशाचं गमक आहे.”, तेजस्वीचा मोलाचा सल्ला

छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निकालात छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वी देशपांडे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात ९९ वा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण शहरात आनंदाचं वातावरण असून नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि नागरिक तिचं अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी करत आहेत.
तेजस्वी हिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नाथ व्हॅली स्कूलमध्ये पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीला गेली आणि तिने लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. शिक्षण घेत असतानाच तिच्या मनात यूपीएससीची तयारी करण्याची ठाम इच्छा निर्माण झाली आणि तिने दिल्लीमध्येच राहून अभ्यास सुरू केला.
डॉक्टर घराण्यातून तेजस्वीला बाळकडू
तेजस्वीचे वडील डॉ. प्रसाद देशपांडे हे घाटी रुग्णालयाच्या मनोविकार विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, तर तिची आई डॉ. गौरी देशपांडे या दंतचिकित्सक आहेत. त्यामुळे घरात अभ्यास आणि सेवाभावाचे वातावरण लाभले, ज्याचा तिला खूप फायदा झाला.
चिकाटी आणि नियोजनबद्ध अभ्यासाने यश
तेजस्वीचा यूपीएससीमधील हा तिसरा प्रयत्न होता. पहिल्या दोन वेळा प्रीलिम्समध्ये यश मिळाले नव्हते, मात्र अपयशाने खचून न जाता तिने आपला अभ्यास अधिक नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध केला. सतत सराव, वेळेचं व्यवस्थापन आणि प्रत्येक विषयावर सखोल लक्ष देत तिने अंतिम यश प्राप्त केलं. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ती सांगते की, “निराश न होता सातत्य ठेवणं आणि प्रत्येक चुकांमधून शिकत पुढे जाणं हेच यशाचं गमक आहे.”