UPSC Result 2021:वडिलांचे स्वप्न मुलीने साकारले;औरंगाबादच्या मानसीने पटकावली ६२७ वी रँक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 16:37 IST2022-05-30T16:18:16+5:302022-05-30T16:37:31+5:30
तिसऱ्या प्रयत्नात तिने मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे चक्रव्यूह भेदत वडिलांचे स्वप्न साकार केले.

UPSC Result 2021:वडिलांचे स्वप्न मुलीने साकारले;औरंगाबादच्या मानसीने पटकावली ६२७ वी रँक
औरंगाबाद: वडिलांचे यूपीएससी देऊन अधिकारी होण्याचे अपुरे स्वप्न अखेर मुलीने बाजी मारत साकारले आहे. औरंगाबादच्या मानसी सोनवणे हिने देशात ६२७ रँक मिळवत यूपीएससीचे उच्च शिखर काबीज केले. मानसीच्या वडिलांना खूप उशिरा या परीक्षेची माहिती मिळाली होती. त्यानंतरही त्यांनी एकदा मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. मात्र, वयोमर्यादेमुळे त्यांना पुन्हा परीक्षा देता आली नव्हती. ही खंत आता मुलीने दूर केल्याने घरात जल्लोषाचे वातावरण आहे.
मानसीची आई अर्चना आणि वडील नरेंद्र हे दोघे अधिकारी असल्याने घरात सुरुवातीपासून अभ्यासाचे वातावरण होते. नोकरीमुळे आई वडिलांच्या सतत बदली होत. यामुळे मानसीची दहावी आणि बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. याचदरम्यान औरंगाबाद या मुळगावी आईवडिलांची बदली झाली. त्यानंतर शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातून मानसीने बीए केले.
पदवीचे शिक्षण घेत असतानाच केली तयारी
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातून बीए करत असतानाच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मानसीने यूपीएससीची तयारी सुरु केली. तर वैकल्पिक विषयासाठी तिने दिल्ली गाठली. तिने खाजगी शिकवणी केल्यानंतर तिने सेल्फ स्टडीला प्राधान्य देत तयारी सुरु केली. तिसऱ्या प्रयत्नात तिने मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे चक्रव्यूह भेदत वडिलांचे स्वप्न साकार केले.
सातत्य हीच गुरुकिल्ली
यूपीएससीच्या अभ्यासात सातत्य हीच गुरुकिल्ली आहे. तयारी करत असताना अनेकदा नैराश्य येऊ शकते. पण मानसिक कणखरपणा टिकवून ठेवल्यास यश आपलेच आहे. माझ्या यशाचे सर्वात जास्त श्रेय वडिलांना जाते. तसेच आई, बहिण सर्व नातेवाईकांनी मला कायम प्रोत्साहन दिले.
- मानसी सोनवणे