छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात १७ दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. वीज कोसळून आतापर्यंत २७ नागरिकांचा मृत्यू झाला. ३९१ जनावरे दगावली. ४ हजारांहून अधिक हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
मे महिन्याला सुरुवात होताच बळीराजा मशागतीच्या कामाला लागला होता. खरिपासाठी जमीन तयार करून ठेवण्याचे काम मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी सुरू होते. ३ मेपासून अचानक आभाळ भरून येणे, विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. रोज पाऊस सुरूच आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. मराठवाड्यात विजा कोसळून आतापर्यंत २७ नागरिकांचा मृत्यू, तर २१ जण जखमी झाले. मयतांमध्ये सर्वाधिक ७ जण जालना जिल्ह्यातील आहेत. जनावरांची जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत ३९१ लहान- मोठी जनावरे मरण पावली. वादळ वाऱ्याने बीड जिल्ह्यात ३, परभणीत एका घराची मोठी पडझड झाली. अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या मराठवाड्यात ८४ आहे. अवकाळीने बाधित गावांची संख्या आता ५९७ पर्यंत पोहोचली असून, ७ हजार १४६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला.
शेतीपिकांचे मोठे नुकसानअवकाळी पावसाने जिरायत जमिनीवरील २५१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. १ हजार ८८४ हेक्टर बागायती पिकांचे तर २ हजार ८२ हेक्टरवरील फळबागांमधील पिकांचे नुकसान झाले.
वीज कोसळून कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू?छत्रपती संभाजीनगर --------------३जालना-------------------------------७परभणी------------------------------१हिंगोली------------------------------२नांदेड--------------------------------५बीड----------------------------------५लातूर---------------------------------२धाराशिव-----------------------------२एकूण--------------------------------२७