विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर; केंद्रीय महोत्सव कधी, कुठे होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:42 IST2025-08-19T15:41:43+5:302025-08-19T15:42:13+5:30
गणेश उत्सव झाल्यानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन

विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर; केंद्रीय महोत्सव कधी, कुठे होणार?
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदापासून जिल्हानिहाय होणार आहे. गणेश उत्सव झाल्यानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन केले असून, यजमान पदासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक महाविद्यालय निवडण्यात आले असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.
युवक महोत्सवाच्या तयारीसाठी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत महोत्सव आयोजन करण्याबाबत विस्तृतपणे चर्चा झाली. त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव या चारही जिल्ह्यांत युवक महोत्सवाचे आयोजन केल्यानंतर लगेच ‘ केंद्रीय युवक महोत्सव ’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गुणानुक्रमे पहिले तीन संघ केंद्रीय महोत्सवात सहभागी होतील. जिल्हा महोत्सव संलग्नित महाविद्यालयात तर केंद्रीय महोत्सव विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर या मुख्य कॅम्पसमध्ये घेण्यात येणार आहे. युवक महोत्सवासाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन ठेवली असल्याचेही डॉ. अंभुरे यांनी सांगितले. तसेच महोत्सवात एकूण ५ गटात २८ कलाप्रकार सादर होणार आहेत. तसेच शोभायात्रा हा स्वतंत्र कलाप्रकारही असणार आहे.
असे असणार जिल्हानिहाय वेळापत्रक
धाराशिव जिल्ह्यातील महोत्सव जवाहर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अणदूर येथे ८ व ९ सप्टेंबर दरम्यान होईल. त्यानंतर बीड जिल्ह्यात र.ब. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे ११ व १२ सप्टेंबर, जालना जिल्ह्यात मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय, अंबड येथे १५ व १६ सप्टेंबर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांचा महोत्सव देवगिरी महाविद्यालयात १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यावेळी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व सांस्कृतिक प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, डॉ. गणेश मोहिते, प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित, डॉ. विनोद जाधव, प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, डॉ. समाधान इंगळे, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व डॉ. अंकुश कदम यांची यावेळी उपस्थिती होती.
केंद्रीय महोत्सव विद्यापीठ परिसरात
या चारही जिल्ह्यांचे महोत्सव संपल्यानंतर २७ ते ३० सप्टेंबर या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य परिसरात केंद्रीय युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. सल्लागार समिती, संयोजन समिती, जिल्हा समन्वयक व विद्यार्थी विकास विभागाचे कर्मचारी महोत्सवासाठी परिश्रम घेत असल्याचेही संचालक डॉ. अंभुरे यांनी सांगितले.