विद्यापीठ युवक महोत्सवाची जय्यत तयारी
By Admin | Updated: September 11, 2016 01:22 IST2016-09-11T01:21:32+5:302016-09-11T01:22:58+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला असून, संयोजन समितीने जय्यत तयारी केली आहे.

विद्यापीठ युवक महोत्सवाची जय्यत तयारी
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला असून, संयोजन समितीने जय्यत तयारी केली आहे. महोत्सवात आतापर्यंत १५१ महाविद्यालयांच्या संघांनी नोंदणी केली असून, सुमारे साडेतीन हजार कलावंत सहभागी होणार आहेत.
महोत्सवात सहभागी होण्यासाठी गुरुवारी (दि. ८) सायंकाळापर्यंत १५१ महाविद्यालयाच्या संघांनी नोंदणी केली आहे. यामध्ये १५१ पुरुष व्यवस्थापक व ९५ महिला व्यवस्थापकांचा समावेश आहे. तर विविध ३५ कला प्रकारांत २७१० मुले व ६१५ मुली, अशा सुमारे साडेतीन हजार कलावंतांनी नावनोंदणी केली आहे. अद्यापही २५० महाविद्यालयांच्या संघांनी नावे नोंदविलेली नाहीत. दरम्यान, महोत्सवाचा ‘किरण आशेचा, वेध भविष्याचा’ या लोगोचे उद्घाटन रंगकर्मी श्रीकांत नाडापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. संभाजी भोसले, प्राचार्य डॉ. एन. डी. पेरगाड, प्रा. टी. एम. जगताप, प्रा. सुयोग अमृतराव आदींची उपस्थिती होती.
हा लोगो खावा सय्यद यांनी तयार केला आहे. महोत्सव १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय (तुळजापूर) येथे होत आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ‘शेतकऱ्यांच्या जीवनात नवी उमेद’ या थीमवर महोत्सव होत आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तर प्रा. संभाजी भोसले हे संयोजन समितीचे अध्यक्ष आहेत. आतापर्यंत १५१ महाविद्यालयांनी आपल्या प्रवेशिका पाठविल्या आहेत, अशी माहिती विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी दिली.