कार्यमुक्त न होता प्रशासनालाच जाब विचारला; विद्यापीठाने बदली आदेश धुडकावणाऱ्या कक्ष अधिकाऱ्याचे वेतन रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 14:40 IST2020-12-01T14:17:44+5:302020-12-01T14:40:43+5:30
वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला.

कार्यमुक्त न होता प्रशासनालाच जाब विचारला; विद्यापीठाने बदली आदेश धुडकावणाऱ्या कक्ष अधिकाऱ्याचे वेतन रोखले
औरंगाबाद : बदली झाल्यानंतर कार्यमुक्त न होता ठाण मांडलेल्या परीक्षा विभागातील कक्ष अधिकाऱ्याविरुद्ध वेतन रोखण्याची कारवाई विद्यापीठ प्रशासनाने केली आहे.
वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर कुलगुरूंनी कोणत्या विभागात कोणता कर्मचारी व तो कधीपासून काम करतो, याबाबतची माहिती जाणून घेतली. कुलगुरूंच्या आदेशानुसार कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी १९ ऑक्टोबर रोजी २१ स्थायी व १० रोजंदारीवरील कर्मचारी, अशा ३१ कर्मचाऱ्यांचे बदली आदेश निर्गमित केले. दरम्यान, ३० ऑक्टोबरपूर्वी जवळपास बदली झालेले सर्वच कर्मचारी व अधिकारी कार्यमुक्त झाले व बदलीच्या विभागात रूजूही झाले.
परीक्षा विभागातील कक्ष अधिकारी पोपट निकम हे मात्र कार्यमुक्त झाले नाहीत. ते आहेत त्याच ठिकाणी सेवा बजावत होते. यासंदर्भात कुलसचिव डॉ. सूर्यवंशी यांनी निकम यांना कार्यमुक्त होण्याबाबत सुरूवातीला तोंडी सूचना दिल्या. तरीही ते कार्यमुक्त झाले नाहीत. त्यानंतर त्यांना कारणे दर्शक नोटीस बजावली. नोटीसला उत्तर द्यायच्याऐवजी निकम यांनी त्या नोटिसीच्या पाठीमागे लिहून आपली बदली करण्याचे कारण काय, असा प्रशासनाला प्रश्न विचारला. प्रशासनाने त्यांंना एकतर्फी कार्यमुक्त केले व त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश दिले.
६ कक्ष अधिकाऱ्यांच्या झाल्या होत्या बदल्या
कक्ष अधिकारी पोपट निकम यांच्यासह सहा कक्ष अधिकाऱ्यांच्या विविध विभागांत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये निकम यांची परीक्षा विभागातून राष्ट्रीय सेवा विभागात, कक्ष अधिकारी बी. एन. फड यांची परीक्षा विभागातून कुलसचिव कार्यालय, कक्ष अधिकारी ए.ए.वडोदकर यांची प्र- कुलगुरू कार्यालयातून सांख्यिकी विभागात, कक्ष अधिकारी जी. जी. खरात यांची आस्थापना विभागातून लेखा विभागात, कक्ष अधिकारी वाय. एस. शिंदे यांची लेखा विभागातून आस्थापना विभागात, कक्ष अधिकारी डॉ. ए.यू. पाटील यांची सांख्यिकी विभागातून पीएच.डी. विभागात बदली करण्यात आली.