विद्यापीठ देणार जीवन गौरव पुरस्कार
By Admin | Updated: August 18, 2014 00:39 IST2014-08-18T00:22:34+5:302014-08-18T00:39:06+5:30
औरंगाबाद : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

विद्यापीठ देणार जीवन गौरव पुरस्कार
औरंगाबाद : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
२३ आॅगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असून, या समारंभात कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, सामाजिक, आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविले जाणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी मान्यवर व्यक्तींकडून प्रस्ताव किंवा त्यांच्याकडून माहिती मागविली जाणार नाही.
विद्यापीठाची पाच सदस्यीय शोध समिती ही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शोध घेईल. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये उल्हास उढाण, डॉ. गीता पाटील, बीसीयूडीचे संचालक डॉ. कारभारी काळे हे सदस्य असतील. कुलसचिव डॉ. धनराज माने हे या समितीचे सदस्य सचिव असतील. पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र असेल.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक काल उस्मानाबाद उपकेंद्रामध्ये झाली. त्या बैठकीत पुरस्कार देण्याबाबत चर्चा झाली. केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी पद्मश्री, पद्मभूषण आदी पुरस्काराने विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्तींना गौरविण्यात येते. त्या धर्तीवर विद्यापीठानेही वर्धापन दिनाचे औचित्य साधून यापुढे दरवर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करावे, हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने मंजूर केल्यानंतर सदरील पुरस्कारासाठी स्वत: विद्यापीठाने समाजातील अशा मान्यवरांचा शोध घेण्याचा प्रस्ताव पुढे आला.
त्यानुसार कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय शोध समिती स्थापन केली. ही समिती समाजातील कर्तबगार व्यक्तींचा शोध घेणार असून, २३ आॅगस्ट रोजी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.