विद्यापीठ अधिसभा निवडणूक: ‘पदवीधर’ प्रवर्गासाठी दाखल १२६ अर्जांची छाननी पूर्ण
By योगेश पायघन | Updated: November 5, 2022 20:03 IST2022-11-05T20:02:41+5:302022-11-05T20:03:17+5:30
पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

विद्यापीठ अधिसभा निवडणूक: ‘पदवीधर’ प्रवर्गासाठी दाखल १२६ अर्जांची छाननी पूर्ण
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पदवीधर गटातून १० जागांसाठी दाखल १२६ अर्जांची छानणी प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. दुपारी १२ ते ३ या दरम्यान महात्मा फुले सभागृहात ही प्रक्रीया पार पडली. वैध अवैध उमेदवारांच्या अर्जांची यादी रविवारी जाहीर करणअयात येणार असल्याची माहीती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भगवान साखळे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये खुल्या गटातून पाच तर आरक्षित गटातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. आजपर्यंत एकूण १२६ अर्ज दाखल झाले. खुल्या प्रवर्गातून ६४ अर्ज, महिला ८ अर्ज, अनूसुचित जाती ११, अनूसूचित जमाती ७, इतर मागास वर्ग ११ तर भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून २५ अर्ज आहेत. कुलसचिव डॉ. साखळे, निवडणूक सल्लागार समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, सदस्य डॉ. राम चव्हाण, डॉ. भारती गवळी, डॉ. मुस्तजिब खान, डॉ. प्रवीण यन्नावार, उपकुलसचिव दिलीप भरड, डॉ.गणेश मंझा, डॉ.विष्णु कऱ्हाळे, संजय कवडे, डॉ.प्रताप कलावंत, विजय मोरे, अर्जुन खांड्रे, संजय लांब, डॉ.श्रीकांत माने आदींसह निवडणूक विभागातील अधिकारी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढच्या टप्प्यातील निवडणूक १० डिसेंबर रोजी ?
प्राचार्य ८ अपिल, महाविद्यालयीन प्राध्यापक १५ तर विभागप्रमुख ७ अशा ३० अपिलांवर बुधवारी तर संस्थाचालक प्रवर्गातून दाखल १५ अपिलांवर गुरुवारी सुनावण्या पुर्ण झाल्या. शुक्रवारी विद्या परिषदेवर निवडूण येणाऱ्या आठ जागांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पुर्ण झाली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकांचे वेळापत्रक पुढील दोन तीन दिवसांत जाहीर होईल. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीसाठी मतदान १० डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.