ऑनलाइन फसवणुकीत ‘गोल्डन अवर’चे महत्त्व जानले, वृद्ध दाम्पत्याचे ३.८१ लाख रुपये वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:40 IST2025-10-17T16:35:32+5:302025-10-17T16:40:01+5:30
गुगलवर डिशटीव्हीचा हेल्पलाइन क्रमांक शोधला अन् सायबर गुन्हेगारांनी संपर्क केला

ऑनलाइन फसवणुकीत ‘गोल्डन अवर’चे महत्त्व जानले, वृद्ध दाम्पत्याचे ३.८१ लाख रुपये वाचले
छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्ह्यात ‘गोल्डन अवर’ला अनन्यसाधारण महत्त्व असते. गुन्हा, फसवणूक घडल्याच्या तासाभरात गुन्हेगारांना पोहोचलेला किंवा पोहोचणारे पैसे वाचविण्याची संधी पोलिसांसह बँकेला असते. आपण फसलाे गेल्याचे लक्षात येताच ही बाब लक्षात ठेवत एका वृद्ध दाम्पत्याने तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनीदेखील तत्परता दाखवत सूत्रे हलविल्याने दाम्पत्याचे ३ लाख ८३ हजार रुपये वाचविण्यात यश आले.
जवाहरनगरमध्ये राहणारे कुलकर्णी दाम्पत्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. दि. १४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या डिश टीव्हीमध्ये समस्या उद्भवली होती. त्याच्या तक्रारीसाठी त्यांनी कंपनीचा हेल्पलाइन क्रमांक गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झाला नाही. काही वेळातच त्यांना कंपनीकडून बोलत असल्याचे सांगणारा अज्ञात क्रमांकावरून कॉल प्राप्त झाला. त्याला अडचण सांगताच कॉलवरील व्यक्तीने ५ रुपये फी भरण्यास सांगितले. कुलकर्णी यांना विश्वासात घेत बँक खाते व ओटीपीची माहिती घेतली. काही मिनिटांत कुलकर्णी यांच्या बँक खात्यातून ९५ हजार रुपये वळते झाले. ही बाब त्यांनी कॉलवरील व्यक्तीला सांगितले. तेव्हा त्याने ती रक्कम परत करण्यासाठी पुन्हा त्यांच्या पत्नीच्या बँक खात्याची माहिती घेतली.
मग मोबाइलचा ताबा घेणारे ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले
दुसऱ्या बँक खात्याची माहिती देताच कुलकर्णींना हेल्प डेस्क हे मोबाइलचा ताबा मिळवणारे ॲप, एक एपीके फाइल इन्स्टॉल करण्यास सांगितले. हे करताच कुलकर्णी यांच्या मोबाइलचा संपूर्ण ताबा सायबर गुन्हेगारांना मिळाला व त्यांच्या पत्नीच्या खात्यातूनही १ लाख ३५ हजार रुपये वळते झाले.
फसल्याचे कळले आणि ‘गोल्डन अवर’ साधला
आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकल्याचे कुलकर्णी दाम्पत्याला कळाले. त्यांनी न घाबरता तत्काळ भावाला ही बाब कळवली. भावाने सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर यांना संपर्क केला. कल्याणकर यांनी जवाहरनगरचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांना मदतीच्या सूचना केल्या. कुलकर्णी दाम्पत्य तत्काळ ठाण्यात दाखल झाले. निरीक्षक सचिन कुंभार, अंमलदार मारोती गोरे यांनी पहिले त्यांच्या मोबाइलमधील सायबर गुन्हेगारांचे ॲप, एपीके फाइल काढून टाकल्या. त्यानंतर एसबीआय बँकेला संपर्क साधून खात्यातील व्यवहार थांबवण्यास सांगितले. त्यांच्या खात्यातून गेलेले दोन लाख रुपये बँकेने गोठवले, तर उर्वरित रक्कमही जाण्यापासून वाचविली. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाचल्याने पोलिसांचे आभार मानताना कुलकर्णी दाम्पत्याला अश्रू अनावर झाले.
का महत्त्वाचा असतो ‘गोल्डन अवर’?
-ऑनलाइन फसवणुकीत डिजिटल पुरावे लवकर नष्ट होतात. ऑनलाइन व्यवहार, आयपी ॲड्रेस, लॉगइन डिटेल्स, ट्रान्जेक्शन आयडी, काही तासांत बदलतात किंवा डिलिट होतात. त्यामुळे सुरुवातीच्या काही तासांतच ती माहिती मिळाली, तर तपासासाठी उपयोगी ठरते.
-सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या पैसे वळते करण्यासाठीची प्रक्रिया तासाभरात थांबविण्यात यश मिळण्याची दाट शक्यता असते.
-फसवणुकीत बँक खात्यात गेलेले पैसे तत्काळ गोठवतात येतात.
-आरबीआयसह केंद्र सरकारच्या सायबर क्राइम संकेतस्थळावर तासाभरात तक्रार गेल्यावरही रक्कम गोठवता येते.
पोलिसांकडे जाताना हेही करा
ऑनलाइन फसवणूक होताच गोल्डन अवरमध्ये पोलिसांकडे धाव घ्या. हे करत असतानाच तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर कॉल करावा. शिवाय, सायबर पोर्टलवर www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.