अघोषित उत्पन्नावरील कर भरा हप्त्याहप्त्याने
By Admin | Updated: July 23, 2016 01:15 IST2016-07-23T00:26:00+5:302016-07-23T01:15:30+5:30
औरंगाबाद : इन्कम डिक्लरेशन स्कीम अंतर्गत आपल्याकडील अघोषित उत्पन्न जाहीर करण्यासाठी मराठवाड्यातील करदाते पुढे येत आहेत, ही आनंदाची बाब आहे.

अघोषित उत्पन्नावरील कर भरा हप्त्याहप्त्याने
औरंगाबाद : इन्कम डिक्लरेशन स्कीम अंतर्गत आपल्याकडील अघोषित उत्पन्न जाहीर करण्यासाठी मराठवाड्यातील करदाते पुढे येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. अघोषित संपत्तीवर एकदम ४५ टक्के कर भरणे कठीण जात असेल अशा करदात्यांना ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत तीन हप्त्यांत कर भरण्याची सुविधा आयकर विभागाने दिली आहे, या संधीचे सोने करा व अघोषित उत्पन्न जाहीर करून निश्चिंतपणे झोपा, असे आवाहन मुख्य आयकर आयुक्त (नाशिक) अंबरीशचंद्र शुक्ला यांनी केले.
इन्कम डिक्लरेशन स्कीम अंतर्गत उद्योजक व व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणीवर चर्चा करण्यासाठी आयकर विभागाच्या वतीने शुक्रवारी दुपारी चर्चासत्राचे आयोजन केले होते. सातारा परिसरातील आयसीएआय भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव, प्रधान आयकर आयुक्त रूबी श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर सीएमआयएचे अध्यक्ष गुरुप्रीतसिंग बग्गा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, आयसीएआयच्या अध्यक्षा रेणुका देशपांडे, इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे विजय शर्मा, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कासलीवाल यांची उपस्थिती होती. शुक्ला म्हणाले की, अघोषित उत्पन्नावर ४५ टक्के कर आकारणी केली जाईल. अनेक उद्योजक व व्यापारी संघटनांनी मागणी केली होती की, एकदम ४५ टक्के रक्कम भरणे कठीण जाईल. याचा विचार आयकर विभागाने केला आहे. अघोषित उत्पन्न जाहीर करण्याची ३० सप्टेंबर २०१६ अंतिम तारीख आहे. या कालावधीत ज्यांनी अघोषित उत्पन्न जाहीर केले, त्यांना कर,अधिभार व दंड तीन हप्त्यांत भरण्याची सवलत दिली आहे. यात ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत २५ टक्के, ३१ मार्च २०१७ पर्यंत २५ टक्के व शेवटचा हप्ता ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत ५० टक्के कर भरता येणार आहे. अघोषित उत्पन्न ३० सप्टेंबरच्या आत घोषित केले नाही तर पुढे कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रारंभी, आयडीएस योजनेला करदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असे आश्वासन महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष राम भोगले यांनी मुख्य आयकर आयुक्तांना दिले. तर अघोषित उत्पन्नावरील ४५ टक्के कर हप्त्या हप्त्याने भरण्याची उद्योजक व व्यापारी संघटनांनी केलेली मागणी पूर्ण केल्याबदल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी आयकर विभागाचे स्वागत केले. प्रश्न उत्तराच्या वेळी ‘टीडीएस’चा एकच प्रश्न विचारला गेला. त्यानंतर कोणीही प्रश्न, शंका विचारली नाही. संचालन नंदकिशोर मालपाणी यांनी केले. आयकर विभागाने आयोजित केलेल्या या चर्चासत्रासाठी खास केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या सदस्या नीती सिंग येणार होत्या; पण त्यांना अचानक बैठकीसाठी दिल्लीत थांबावे लागल्याने त्यांना येता आले नाही, असा खुलासा मुख्य आयकर आयुक्तांनी केला.
८० वर्षांच्या ज्येष्ठाने केली अघोषित संपत्ती जाहीर
प्रधान आयकर आयुक्त श्रीदयाल श्रीवास्तव यांनी सांगितले की, १ जूनपासून इन्कम डिक्लरेशन स्कीम सुरु झाली आहे. एका ८० वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीने येऊन त्याच्याकडील अघोषित संपत्ती जाहीर केली. माझ्यावरील अनेक वर्षांचे दडपण आता कमी झाले.
आता मी कमविलेल्या संपत्तीचा माझ्या मुलांना फायदा घेता येईल, असे ते म्हणाले. आयडीएस ही योजना संपूर्णपणे पारदर्शक आहे. यामुळे छाननी, चौकशी व कर निर्धारणापासून सुरक्षा मिळणार आहे. तुम्ही अघोषित संपत्ती मुदतीच्या आत जाहीर केली नाही तर तुमच्यावर कारवाई होईल तेव्हा तुम्ही न्यायालयात गेला तरी न्यायालय तुम्हाला विचारेल की, आयकर विभागाने तुम्हाला एक संधी दिली होती, तेव्हा तुम्ही काय करीत होता? यामुळे संधीचे सोने करा, असा सल्लाही श्रीवास्तव यांनी दिला.