छत्रपती संभाजीनगर : युनानी डॉक्टर असल्याचे सांगणाऱ्या एकाने डोळ्यांसंबंधी उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेला ॲलोपॅथीची औषधी दिली. सेवनानंतर महिलेचा चेहरा विद्रूप झाला. अन्नाचे सेवन बंद होऊन वाचाही गेली. पतीने याबाबत पाठपुरावा केल्यानंतर तथाकथित डॉक्टरचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अश-शिफा चॅरिटेबल क्लिनिकच्या मोहम्मद इब्राहिम सौदागर याच्यावर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेचे पती बाबा खान मिया खान (३२, रा. जाफर गेट, मोंढा) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. जून २०२५ मध्ये त्यांची पत्नी रईसा यांच्या डोळ्यांमध्ये वेदना होत होत्या. त्यामुळे त्या १२ जून रोजी दुपारी १२:३० वाजता शहाबाजारमधील रुग्णालयात गेल्या. त्याच रुग्णालयाच्या वरील मजल्यावर आराेपी मोहम्मद इब्राहिमचे अश शिफा चॅरिटेबल क्लिनिक आहे. त्याने रईसा यांना डोळ्यांवर उपचार करण्याचे आश्वासन दिले. एका चिठ्ठीवर औषधी लिहून दिली. मात्र, सदर औषधी घेताच पहिल्या दिवशी थंडी-ताप आला. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर जखमा होण्यास सुरुवात झाली. बाबा खान यांनी रुग्णालयात धाव घेतल्यावर युनानी डॉक्टरने दिलेल्या औषधींचा गंभीर परिणाम झाल्याचे सांगितले. त्यांनी पत्नीला एमजीएम रुग्णालयात दाखल केले.
२०३ दिवसांपासून उपचार सुरू१६ जून रोजी रईसा यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेव्हापासून तब्बल २०३ दिवसांपासून त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. डॉक्टर प्रयत्न करीत आहेत.
पतीनेच केला पाठपुरावा, पोलिसांकडे तक्रारपत्नीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त बाबा खान यांनी सौदागर याची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्याच्या कुठल्याच औषधीच्या चिठ्ठीवर तो युनानी डॉक्टर असल्याचे नमूद नाही. शिवाय, नेत्रतज्ज्ञ नसताना त्याने चुकीच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे अर्ज दिला. याबाबत स्थापन विधि अधिकारी, तसेच घाटी रुग्णालयाच्या समितीने इब्राहिम दोषी असल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्याचा अभिप्राय दिला. रविवारी कारवाई करण्यात आली. सोमवारी त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.
असह्य वेदना, कुटुंबावर दु:खाचा डोंगरबाबा खान लोखंड मार्केट येथे काम करतात. रुग्णालयात दाखल रईसा यांना डॉक्टरांनी दिलेली पावडर मिश्रित करून पातळ पदार्थच द्यावे लागत आहेत. सातत्याने व्हेन्टीलेटरवर ठेवावे लागत आहे. उपचारासाठी खान यांना त्यांचा भारतनगरमधील प्लॉट, त्यांची दुचाकीदेखील विकण्याची वेळ आली.
Web Summary : A woman lost her voice and was disfigured after a fake doctor prescribed allopathic medicine for an eye problem. Police arrested the accused following investigation and patient's husband complaint.
Web Summary : एक फर्जी डॉक्टर द्वारा आंख की समस्या के लिए एलोपैथिक दवा देने के बाद एक महिला ने अपनी आवाज खो दी और उसका चेहरा बिगड़ गया। पुलिस ने जांच और पति की शिकायत के बाद आरोपी को गिरफ्तार कर लिया।