उमरग्याचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प

By Admin | Updated: July 28, 2014 00:57 IST2014-07-28T00:02:55+5:302014-07-28T00:57:45+5:30

उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरण पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळतीचे गृहण लागल्याने गेल्या १५ दिवसापासून उमरगा शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

Umrupa water supply has been stalled for fifteen days | उमरग्याचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प

उमरग्याचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प

उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरण पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळतीचे गृहण लागल्याने गेल्या १५ दिवसापासून उमरगा शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
उमरगा शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या आसपास आहे. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. शहरात एकूण पाच हजारावर नळ कनेक्शन आहेत. शहराच्या वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी याआधी कोळसूर, कोरेगाव, तुरोरी प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. या पाणीपुरवठा योजना बंद करून पालिकेने गेल्या वर्षभरापासून २३ कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र माकणी धरण पाणीपुरवठा योजना सुरू केली.
पाच हजारावर नळ कनेक्शन असलेल्या उमरगा शहराकडे सातत्याने पावसाने पाठ फिरविली असून दुसरीकडे विंधन विहिरी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खालावत चालली असून, पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील मलंग प्लॉट, महात्मा बसवेश्वर विद्यालय, सांस्कृतिक सभागृह, हमीदनगर आदी भागात जलकुंभामार्फत टप्प्याटप्प्याने सात दिवसाआड एकवेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बँक कॉलनी, शिवपुरी, विष्णूपुरी, साईनगर, गणेशनगर, माने नगर, नंदनवन कॉलनी, एसटी कॉलनी या भागासह नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या नवीन नळधारकांसाठी नळाद्वारे पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. परंतु संपूर्ण शहराला सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. (वार्ताहर)
नियोजनाचा अभाव
उमरगा शहरासाठी माकणी धरणातून १५० अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीद्वारे वर्षभरापासून पाणीपुरवठा केला जात आहे. समुद्राळ येथे जलशुद्धिकरण केंद्रात पाणी शुद्ध करून पाईपलाईनद्वारे जलकुंभात सोडले जाते. जलकुंभाच्या वॉल्व्हवर वेळीच नियंत्रण नसल्याने दुसऱ्या जलकुंभापर्यंत पाणी जात असताना पाईपलाईनवर दाब पडून वारंवार गळती होत असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान शहराला पंधरा दिवसापासून तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. बहुतांश लोकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे.
गळतीचे ग्रहण
माकणी ते समुद्राळ या १७ किमी अंतरात गेल्या दहा वर्षापूर्वी एक फुटी लोखंडी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मध्यतंरीच्या कालावधीत या पाईपलाईनचा वापर नसल्याने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करताना या पाईपाला अनेक ठिकाणी मार लागला आहे.त्यामुळे १७ किमीच्या अंतरावर १०० ठिकाणापेक्षा जास्त गळतीच्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. समुद्राळ, नागराळ येथे गळतीची नुकतीच दुरुस्त करण्यात आली आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर शनिवारी दत्तमंदिरानजीक व मोरे पेट्रोल पंपाजवळ या पाईपलाईनला पुन्हा गळती लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करताना तब्बल सव्वाशे वेळा पाईपलाईनच्या गळतीची दुरुस्ती करण्यात आली मात्र सातत्याने गळती होत असल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Umrupa water supply has been stalled for fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.