ठाकरेंचा मोठा निर्णय; बंडखोर जैस्वालांची उचलबांगडी, किशनचंद तनवाणी नवे महानगर प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 05:04 PM2022-08-06T17:04:56+5:302022-08-06T17:05:49+5:30

उद्धव ठाकरेंकडून माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यावर महानगर प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे 

Uddhav Thackeray's big decision; Pradeep Jaiswal's removed, Kishan Chand Tanwani appointed as Shiv Sena's Aurangabad Metropolitan Chief | ठाकरेंचा मोठा निर्णय; बंडखोर जैस्वालांची उचलबांगडी, किशनचंद तनवाणी नवे महानगर प्रमुख

ठाकरेंचा मोठा निर्णय; बंडखोर जैस्वालांची उचलबांगडी, किशनचंद तनवाणी नवे महानगर प्रमुख

googlenewsNext

औरंगाबाद: शिवसेनेत मागील काही वर्षांपासून बाजूला पडलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यावर अखेर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची उचलबांगडी करत तनवाणी यांना महानगर प्रमुख पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. यामुळे जैस्वाल आणि तनवाणी यांच्या मैत्री व प्रतीस्पर्धेचा नवा अंक आता पाहण्यास मिळणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरु असताना अचानक शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडात शिवसेनेच्या ४० आमदारांचा सहभाग आहे. या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे ५ आमदारांचा समावेश आहे. औरंगाबाद मध्ये विधानसभेचे आमदार प्रदीप जैस्वाल हे देखील शिंदे गटात सामील आहेत. दरम्यान, सत्तांतरानंतर शिंदे गट आता पक्षावर देखील वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोरांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करत आहेत. आता ठाकरे यांनी आ. जैस्वाल यांचे महानगरप्रमुख पद काढून घेत त्याजागी शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती केली आहे. तनवाणी आणि जैस्वाल यांचे मैत्री, एकमेकांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवणे असे अनेक किस्से आजही चर्चिले जातात. यामुळे शहरात पुन्हा एकदा जैस्वाल विरुद्ध तनवाणी असा सामना रंगणार आहे.

भाजप प्रवेश, पुन्हा घरवापसी आणि महानगरप्रमुख पद 
माजी आमदार किशनचंद तानवाणी हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल विरुद्ध भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर तनवाणी पुन्हा शिवसेनेत परतले. परंतु, त्यांच्यावर पक्षाने कोणतीही जबाबदारी टाकली नव्हती. सेनेत बंडखोरी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी योग्य निर्णय घ्या अशा आशयाचे होर्डिंग शहरात लावले होते. तनवाणी मोठा निर्णय घेतील असे वाटत असताना आता त्यांची आगामी माहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचा वाढलेला प्रभाव, बंडखोर आमदारांची रणनीती आणि एमआयएमचे वाढते प्रस्थ अशी आव्हाने तनवाणी यांच्या पुढे आहेत. 

पक्ष बळकट करण्याचे लक्ष 
पक्षातील काही पदाधिकारी बंडखोर आमदारांकडे जात आहेत. मात्र, खरा शिवसैनिक टिकून आहे. आगामी काळात पक्ष वाढविण्यावर लक्ष असेल. शिवसैनिकांना बळ देण्याचे पहिले कार्य करणार असून त्यानंतर महापलिका निवडणुकांची तयारी करू. विधानसभा लढण्याचा विचार अद्याप केलेला नाही, पक्ष जो निर्णय घेईल त्यासाठी झोकून देऊन काम करत राहणार.
- किशनचंद तनवाणी, महानगर प्रमुख, औरंगाबाद

Web Title: Uddhav Thackeray's big decision; Pradeep Jaiswal's removed, Kishan Chand Tanwani appointed as Shiv Sena's Aurangabad Metropolitan Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.