Uddhav Thackeray: ‘तेव्हा भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंद केला, हे यांचं हिंदुत्व’, उद्धव ठाकरेंनी इतिहास काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 21:48 IST2022-06-08T21:47:47+5:302022-06-08T21:48:53+5:30
Uddhav Thackeray Aurangabad Sabha: औरंगाबादमध्ये शिवसेनेने जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत आयोजित केलेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढले. तसेच एकदा महागाईविरोधात भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंदची घोषणा केली होती, हेच यांचं हिंदुत्व का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Uddhav Thackeray: ‘तेव्हा भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंद केला, हे यांचं हिंदुत्व’, उद्धव ठाकरेंनी इतिहास काढला
औरंगाबाद - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आज भाजपावर चौफेर हल्ला चढवला. औरंगाबादमध्ये शिवसेनेने जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत आयोजित केलेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढले. तसेच एकदा महागाईविरोधात भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंदची घोषणा केली होती, हेच यांचं हिंदुत्व का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने एकदा भारत बंद नारा दिला होता. शिवसेनासोबत होती म्हणून, नाहीतर त्यांची बंद करण्याची ताकद नाही. बंद घोषित करण्यासाठी जो दिवस निवडला, तो दिवस नेमका गणपतींच्या आगमनाचा होता. शिवसेनाप्रमुखांना मी विचारलं, तेव्हा ते आपण या बंदमध्ये सहभाही व्हायचं नाही, असं ते म्हणाले. त्यानंतर मी सुषमा स्वराज यांना फोन केला. त्यांना म्हटलं बंद दिवशी गणेशोत्स्व आहे. त्यामुळे आमची अडचण होणार आहे. तर त्या म्हणाल्या, गणपती तर दहा दिवस असतो. तेव्हा मी सांगितलं गणपतींच्या आगमनापासून आनंदोत्सवास सुरुवात होते. आपण नाही म्हणालो. माफ करा आम्ही या बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असं सांगितलं, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
त्यावेळी तुम्ही ना हिंदूचे सण बघत नव्हतात, ना लोकांचा आनंद बघत होता. केवळ राजकारण करायचं म्हणून तुम्ही भारत बंद करत होता. भारत बंद म्हणजे बंद. गणपती आले काय गेले काय, हिंदूंचा सण आहे, काही का असेना आम्ही बंद करणार, अशी तुमची भूमिका होती. बाळासाहेबांची शिवसेना होती म्हणून तेव्हा हा बंद झाला नाही. शिवसेना नसती तर काय झालं असतं देव जाणो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
पेट्रोल वाढीनंतर बैलगाडीतून जाणारी अटलजींची भाजपा आज कुठे गेली. हेच तुम्हाला हवे होते का? प्रवक्ते वाचाळपणे बोलतात. देशाची अब्रू गेली भाजपची नाही. मी विचारतो भाजपला अरे कुठे नेऊन ठेवणार आहात भारत आणि महाराष्ट्र माझा. तुम्ही शिवसेनेला नाही हिंदुत्वाला बदनाम करताय. शिवसेनेचे विचार तुम्ही काढू शकणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठामपणे सांगितले.