नववर्षातही उद्धवसेनेला धक्के; माजी महापौर नंदकुमार आणि अनिता घोडेलेंचा शिंदेसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:09 IST2025-01-04T13:08:20+5:302025-01-04T13:09:44+5:30
लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांच्या कालावधीत त्यांना शिंदेसेना आणि भाजपकडून प्रवेशाची ऑफर होती. मात्र त्यांनी तेव्हा उद्धवसेनेचे काम केले.

नववर्षातही उद्धवसेनेला धक्के; माजी महापौर नंदकुमार आणि अनिता घोडेलेंचा शिंदेसेनेत प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : नवीन वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी शहर उद्धवसेनेला जोरदार धक्का देत माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले या दाम्पत्याने शुक्रवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.
उद्धवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय म्हणून नंदकुमार घोडेले ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून घोडेले हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. पक्षाचे कोणतेही पद त्यांच्याकडे नव्हते. जुलै २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा घोडेले यांनी उद्धवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आजारी असतानाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. मध्य मतदारसंघातून ते इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती.
दोन्ही निवडणुकांच्या कालावधीत त्यांना शिंदेसेना आणि भाजपकडून प्रवेशाची ऑफर होती. मात्र त्यांनी तेव्हा उद्धवसेनेचे काम केले. दरम्यान शुक्रवारी नववर्षाच्या तिसऱ्या दिवशी घोडेले दाम्पत्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी आमदार सुरेश जेथलिया यांची उपस्थिती होती. घोडेले दाम्पत्याची पक्षाला सोडचिठ्ठी खैरे यांना धक्का असल्याचे बोलले जात आहे.