दोन वर्षांपासून २७०० लाभार्थ्यांचे अर्ज रखडले
By Admin | Updated: August 18, 2014 01:04 IST2014-08-18T00:09:59+5:302014-08-18T01:04:28+5:30
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई अंबाजोगाईत संजय गांधी निराधार योजना समितीचे अनेक सदस्य बैठकीस उपस्थित राहत नसल्याने तालुक्यात जवळपास ४ हजार ५०० वृद्ध व निराधार लाभार्थ्यांचे

दोन वर्षांपासून २७०० लाभार्थ्यांचे अर्ज रखडले
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
अंबाजोगाईत संजय गांधी निराधार योजना समितीचे अनेक सदस्य बैठकीस उपस्थित राहत नसल्याने तालुक्यात जवळपास ४ हजार ५०० वृद्ध व निराधार लाभार्थ्यांचे विविध योजनांचे अर्ज गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहेत. गैरहजर राहणाऱ्या सदस्यांच्या बेपर्वाईचा मोठा फटका निराधारांना निमूटपणे सहन करावा लागत आहे.
तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत समाजातील उपेक्षित निराधार, विधवा, परित्यक्त्या, अपंग व वृद्धांना शासनाच्या श्रावणबाळ, संजय गांधी योजनेच्या माध्यमातून जगण्याचा आधार उपलब्ध व्हावा या उद्देशाने मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत केली जाते. ही आर्थिक मदत मिळविण्यासाठी तहसील कार्यालयाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना समिती शासनाने स्थापन केली आहे. या समितीत सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा भरणा आहे.
तालुक्यातील निराधारांचा आधार बनण्याची मोठी ताकद त्यांच्या पदात आहे. मात्र, त्यांच्या निष्काळाजीपणामुळे व बैठकीस बोलावूनही उपस्थित राहत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून २७०० वृद्धांचे व निराधारांचे अर्ज रखडले आहेत. शासनाच्या लोकोपयोगी योजना उपेक्षितांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची असते. मात्र, पद मिळताच ते कार्यकर्ते पदाची जबाबदारी स्वीकारत नसल्याचा मोठा फटका उपेक्षितांना सहन करावा लागत आहे.
या संदर्भात वृद्ध, निराधार यांचे वारंवार, मोर्चे आंदोलने होऊनही याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी अनेकांचे अर्ज तहसील कार्यालयात धूळ खात पडून आहेत.
सर्व सदस्यांना एकत्रित आणणार - अमर देशमुख
संजय गांधी निरधार योजना समितीच्या सदस्यांना वारंवार बैठकीचे निमंत्रण देऊनही ते उपस्थित राहत नसल्याने निराधारांचे अर्ज निकाली काढण्यात मोठा अडथळा येत आहे. सर्व सदस्यांना अर्ज बोलावून अर्ज निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अमर देशमुख लोकमतशी बोलतांना म्हणाले. प्रश्न निकाली लावण्याची मागणी आहे.
वृद्ध व निराधारांना आर्थिक साह्य योजनेद्वारे न्याय मिळवून देण्यात अंबाजोगाई तालुक्यातील समिती कुचकामी ठरल्याने ती बरखास्त करावी अशी मागणी ज्येष्ठ समाज सेवक डॉ. द्वारकादास लोहिया यांनी केली आहे. योजनेचे सदस्य आपले कर्तव्य विसरल्याने लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत. अशा पदाची जाणीव नसणाऱ्या सदस्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही डॉ. लोहिया म्हणाले. तसेच निराधारांच्या रखडलेल्या अर्जाबाबत गांभीर्याने विचार न झाल्यास तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करू असा इशारा डॉ. लोहिया यांनी दिला आहे.
सदस्यांच्या गैरहजेरीचा अहवाल पाठविणार वरिष्ठांकडे
या संदर्भात अंबाजोगाईचे तहसीलदार राहुल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, समितीची बैठक बोलावल्यानंतर सर्व सदस्य उपस्थित राहत नसल्याने अर्जांची संख्या वाढत चालली आहे. सदस्यांच्या गैरहजेरीचा अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे तहसीलदार म्हणाले. लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल.