मुंबईसाठी उद्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस; नव्या वेळेत नांदेडहून तर शेवटची जालन्यातून धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 20:17 IST2025-08-25T20:16:01+5:302025-08-25T20:17:03+5:30
जालन्याहून धावणार उद्या शेवटची वंदे भारत एक्स्प्रेस; उद्या सकाळी ११:२० वाजता नांदेडहून उद्घाटनाची फेरी

मुंबईसाठी उद्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस; नव्या वेळेत नांदेडहून तर शेवटची जालन्यातून धावणार
छत्रपती संभाजीनगर : नांदेडला पळवलेल्या जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची २६ ऑगस्ट रोजी उद्घाटन फेरी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून नांदेड येथून वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ केला जाईल. ही उद्घाटनाची वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडहून दुपारी ११:२० वाजता सुटेल, तर याच दिवशी जालन्याहून शेवटची वंदे भारत एक्स्प्रेस नियमित वेळेनुसार धावेल. त्यामुळे मुंबईसाठी मंगळवारी दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत.
नांदेड येथे मंगळवारी सकाळी १०:०० वाजता विस्तारीत वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटन फेरीची वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी २:४८ वाजता छत्रपती संभाजीनगरला दाखल होईल. दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ही रेल्वे पुढे रवाना होईल. आठवड्यातून ६ दिवस ही रेल्वे धावणार असून, बुधवारी नांदेडहून आणि गुरुवारी मुंबईहून ही रेल्वे धावणार नाही.
सध्या छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ५:५० वाजता सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस, २८ ऑगस्टपासून सकाळी ८:१५ वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. त्यामुळे सकाळी मुंबईला गेल्यानंतर सायंकाळी रेल्वेने परतणे अवघड आहे. ‘वंदे भारत’ची अवस्था ‘जनशताब्दी’प्रमाणे होईल आणि प्रवाशांसाठी ती निरूपयोगी होईल.
बोगींची संख्या ८ वरून २० वर
जालन्यावरून धावणारी सध्याची वंदे भारत एक्स्प्रेस ८ बोगींची आहे. नांदेडहून सोडताना ती २० बोगींची होईल. यात २ एक्झिक्युटिव्ह आणि १८ चेअर कार बोगी असतील.
वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक
स्थानकाचे नाव -२६ ऑगस्टपासून आगमन/ प्रस्थान - सध्याचे आगमन/ प्रस्थान
हुजूर साहिब नांदेड - पहाटे ५:०० वा. -
परभणी - ५:४० वा. / ५:४२ वा.-
जालना- ७:२० वा./ ०७:२२वा.- पहाटे ५:०५ वा.
छत्रपती संभाजीनगर - ८:१३ वा./८:१५ वा.- ५:४५ वा./५:५० वा.-
अंकाई ९:४० वा. - ७:२५ वा.
मनमाड जंक्शन ९:५८ वा./ १०:०३ वा.- ७:३८ वा. /७:४० वा.
नाशिक रोड - ११ वा./ ११:०२ वा.-८:३५ वा./८:३७ वा.
कल्याण - १:२० वा. / १:२२ वा.- १०:५५ वा./१०:५७ वा.
ठाणे - १:४० वा. /१:४२वा.- ११:१० वा./११:१२ वा.
दादर - २:०८ वा./ २:१०वा.- ११:३२ वा./११:३४ वा.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई २:२५ वा.- ११:५५ वा.
--------