देशव्यापी ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगरचे दोन अभियंते अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 13:50 IST2025-08-02T13:46:24+5:302025-08-02T13:50:36+5:30

तामिळनाडू पोलिसांच्या तपासात आश्चर्यकारक बाब निष्पन्न; छत्रपती संभाजीनगरजवळील वडगाव कोल्हाटीचे तरुण ‘डिजिटल अरेस्ट’च्या राष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी

Two unemployed engineers from Chhatrapati Sambhajinagar arrested in Nationwide 'Digital Arrest' cyber crime | देशव्यापी ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगरचे दोन अभियंते अटकेत

देशव्यापी ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगरचे दोन अभियंते अटकेत

छत्रपती संभाजीनगर : देशभरात चर्चेत असेल्या डिजिटल अरेस्ट या सायबर क्राइमच्या राष्ट्रीय रॅकेटमध्ये शहरातीलच दोन मुले सहभागी असल्याची धक्कादायक बाब तामिळनाडू पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. श्रीकांत सुरेशराव गाडेकर (३४, रा. वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर), नरेश कल्याणराव शिंदे (२६, रा. आर्यन सिटी, तिसगाव चौफुली, वाळूज) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही अभियंते असून गेल्या अनेक दिवसांपासून ते दिवसभर देवळाई परिसरात हॉटेलमध्ये खोली बुक करून ऑनलाइन फसवणुकीचे टार्गेट पूर्ण करत होते.

तामिळनाडूतील चेन्नईच्या, तिरूवनचेरीत राहणाऱ्या प्रभाकरन कुंधू चंद्रन रुवी यांना दिल्ली सायबर पोलिस असल्याचे भासवून कॉल करण्यात आला होता. बँक खात्यात मनी लॉन्ड्रिंगद्वारे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगून त्यांना डिजिटल अरेस्टमध्ये अडकवले. त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी २७ लाख २४ हजार ९०० उकळण्यात आले होते. या प्रकरणी तामिळनाडूचे तिरूवनचेरी (तांबरम शहर) पोलिस तपास करत होते. तांत्रिक तपास करत असताना तामिळनाडू पोलिसांच्या तपासाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले. पोलिस निरीक्षक व्ही. के. सशिकुमार हे २९ जुलै रोजी पथकासह शहरात दाखल झाले. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन त्यांनी सहकाऱ्याची विनंती केली होती. पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक निरीक्षक पवन इंगळे, अंमलदार श्रीमंत भालेराव, अशोक वाघ, शिवानंद वनगे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

देवळाईतील हॉटेलपर्यंत पोहोचले पोलिस
तामिळनाडू पोलिसांकडे केवळ तांत्रिक पुरावे होते. त्यामुळे आरोपींचा माग काढणे आव्हानात्मक होते. तपासात आरोपी देवळाई चौकातील एका हॉटेलमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा तत्काळ पथकाने हाॅटेल गाठत श्रीकांत व नरेशला ताब्यात घेतले. तामिळनाडू सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सातारा पोलिस ठाण्यात नोंद करुन रवाना झाले.

पोलिस विभाग थक्क
देशभरात डिजिटल अरेस्टच्या नावाने अब्जावधी रुपयांची लुटमार सुरू आहे. अनेक शहरांच्या पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणांनी यात आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा सहभाग निष्पन्न केला आहे. मात्र, डिजिटल अरेस्टचे धागेदोरे शहरातील वडगाव कोल्हाटीच्या तरुणांपर्यंत पोहोचल्याचे कळल्यानंतर पोलिस विभाग थक्क झाला आहे.

सेटअपसाठी हॉटेलमध्ये मुक्काम
डिजिटल अरेस्टमध्ये फसवणारे पोलिस असल्याचे भासवतात. पोलिसांचा गणवेश, पोलिसांचे दालन, मागे तसा सेटअप करुन व्हिडिओ कॉलद्वारे विश्वास संपादित करतात. हा सेटअप उभारण्यासाठीच श्रीकांत व नरेश घर सोडून हॉटेलमध्ये मुक्कामी राहत होते. दोघेही डिजिटल अरेस्टच्या मोठ्या रॅकेटशी जोडले जाऊन टार्गेटनिहाय काम करत असल्याचा संशय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title: Two unemployed engineers from Chhatrapati Sambhajinagar arrested in Nationwide 'Digital Arrest' cyber crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.