वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:41 IST2019-02-04T00:40:56+5:302019-02-04T00:41:25+5:30
घराबाहेर झोपणे महागात पडले : वैजापूर तालुक्यातील घटना; बिबट्याची अफवा

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
वैजापूर : तालुक्यातील भालगाव येथे घराबाहेर झोपलेल्या शेतकऱ्यांवर वन्य प्राण्याने हल्ला केल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. हा हिंस्र प्राणी बिबट्या किंवा लांडगा असण्याची शक्यता असल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मात्र, याबाबत वन विभागाने स्पष्ट बोलण्यास नकार दिल्याने नागरिक संभ्रमात आहेत.
तपास झाल्यानंतरच यावर काही सांगता येईल, अशी भूमिका वन विभागाच्या अधिकाºयांनी घेतली आहे. दरम्यान, बिबट्याच्या अस्तित्वाबाबत वेळोवेळी कळवूनही वन विभागाच्या स्थानिक अधिकाºयांनी तत्परता न दाखविल्याने वन विभागाविरुद्ध नागरिकांचा रोष वाढला आहे. जखमींवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंद्रभान दामोदर शिंदे (८५) व नर्मदाबाई तात्या रहिंज (६०), अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. शिंदे हे भालगाव शिवारातील गट नं. ११६ मधील घराबाहेर झोपले होते. झोपेत असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास हिंस्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला. शिंदे यांनी आरडाओरड केली असता घरात झोपलेले नातेवाईक जागे झाले. त्यांनी त्यांना तातडीने वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर भालगाव शिवारातील गट नं. १४ मधील नर्मदाबाई यांच्यावर या प्राण्याने हल्ला केला. नर्मदाबाईही घराबाहेर झोपल्या होत्या.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले, सहायक वनरक्षक प्रशांत वरुडे, वनपाल एच.एच. सय्यद, बी.पी. झोड, वीरगाव पोलीस ठाण्याचे एपीआय हरीश बोराडे, अक्रम पठाण, विलास सुखदान, शिवनाथ सरोदे, संतोष सोनवणे, संदीप गायकवाड आदींनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. दरम्यान, शेतवस्तीवर पावलांचे ठसे आढळले असले तरी हे ठसे कोणत्या प्राण्याचे आहेत, याची माहिती देण्यास वन अधिकाºयांनी मौन बाळगले आहे.
बिबट्या आला, कोणी नाही पाहिला!
एखादी गोष्ट अस्तित्वात नसताना तिचा आभास निर्माण करणे, यासाठी ‘लांडगा आला रे आला’ ही जातक कथा प्रसिद्ध आहे. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील भालगाव शिवारात घडला. रविवारी पहाटे गावात चक्क बिबट्या आल्याची अफवा पसरली आणि तो पाहण्यासाठी गंगथडी परिसरातील नागरिकांनी भालगावकडे धाव घेतली. यानंतर वीरगाव पोलिसांचा फौजफाटा, वन विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांनी बिबट्याला पकडण्यासाठी सगळा परिसर पिंजून काढला. मात्र, बिबट्या तर सोडाच श्वानदेखील दृष्टीस न पडल्याने सगळ्यांची निराशा झाली. याबाबत दिवसभर गंगथडी परिसरात अफवांचे पेव फुटले होते.
गंगथडी परिसरात बिबट्याची दहशत कायम
तालुक्यात या आधीही गंगथडी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून दहशत
अनेक ठिकाणी बिबट्याने हल्ला केला आहे. एक महिन्यापूर्वी तालुक्यातील कापूस वाडगाव शिवारातील शेतवस्तीवर तोंड व गळा फाडून एकाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेतील भीमाशंकर आनंद गिरी (५५) यांचा चेहरा विद्रूप झाला होता. भीमाशंकर यांना हिंस्र प्राण्यांनीच मारून टाकल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. यावेळी वीरगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित व्यक्तीसह तब्बल २०० लोकांची चौकशी केली. मात्र, खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे बिबट्याची वार्ता पसरताच नागरिक घराबाहेर पडायला घाबरतात. त्यातच आता भारनियमन वाढल्यामुळे अनेक गावांत रात्री शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे शेतकरी बिबट्याच्या वावरामुळे धास्तावले आहेत.
वन विभागाकडून दुर्लक्ष
वारंवार होणाºया बिबट्याच्या हल्ल्यांबाबत येथील नागरिकांनी वन विभागास पत्र देऊन परिसरात पिंजरा लावण्याबाबत कळविले आहे. मात्र, वन विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांनी अद्याप या भागात पिंजरा न लावल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. भविष्यात बिबट्याने पुन्हा हल्ला केला आणि त्यात मनुष्यहानी झाली, तर जबाबदार कोण, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी केला आहे.