‘आर्यभट्ट’ अवकाशात सोडण्यात मराठवाड्यातील दोघांचे योगदान; ‘इस्रो’ कडून होणार सन्मान

By राम शिनगारे | Updated: March 10, 2025 18:00 IST2025-03-10T17:59:00+5:302025-03-10T18:00:02+5:30

भारताच्या पहिल्या उपग्रहाचा सुवर्णमहोत्सव : संपूर्ण चमू ‘इस्रो’कडून निमंत्रित

Two scientist from Marathwada contributed to launching India's fisrt satellite 'Aryabhatta' into space; Honored by 'ISRO' | ‘आर्यभट्ट’ अवकाशात सोडण्यात मराठवाड्यातील दोघांचे योगदान; ‘इस्रो’ कडून होणार सन्मान

‘आर्यभट्ट’ अवकाशात सोडण्यात मराठवाड्यातील दोघांचे योगदान; ‘इस्रो’ कडून होणार सन्मान

छत्रपती संभाजीनगर : अंतराळाच्या क्षेत्रात अमेरिका-रशियामध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच भारतीय बनावटीचा पहिला आर्यभट्ट हा उपग्रह बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) १९ एप्रिल १९७५ रोजी अवकाशात सोडला. त्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त ‘इस्रो’त आर्यभट्ट अवकाशात सोडणाऱ्या चमूच्या सन्मानासाठी सोमवारी (दि. १०) विशेष समारंभाचे आयोजन केले आहे. त्यात मराठवाड्यातील दोन शास्त्रज्ञांना ‘इस्रो’कडून आमंत्रित करण्यात आले आहे.

भारताच्या ‘इस्रो’ने विकसित केलेला आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आहे. भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव याला देण्यात आले. याचे प्रक्षेपण रशियाच्या कपुस्टिन यार या अवकाश केंद्रावरून १९ एप्रिल १९७५ रोजी कॉसमॉस-३ एम हा उपग्रह वाहक वापरून केले. हा उपग्रह बनविण्यासाठी ‘इस्रो’ने वेगवेगळे चमू बनविले होते. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील शास्त्रज्ञ राजाराम गणगे आणि लातूर जिल्ह्यातील भाऊसाहेब हाके पाटील यांचा समावेश होता. उपग्रहाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू असून, तत्कालीन ‘इस्रो’चे संचालक प्रा. यू. आर. राव यांचा १० मार्च रोजी जन्मदिवस आहे.

सॅटेलाईट डिझाईनिंगवर काम
आर्यभट्ट उपग्रह बनविणाऱ्या चमूमधील राजाराम गणगे हे अंबाजोगाई तालुक्यातील वालेवाडी गावचे मूळ रहिवासी. त्यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९७१ साली इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलीकम्युनिकेशनमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर ‘इस्रो’त शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. त्यांनी १९७१ ते १९८३ अशी १३ वर्षे ‘इस्रो’मध्ये काम केले. आर्यभट्ट उपग्रह बनवण्यासाठी स्थापन केलेल्या सॅटेलाईट डिझाइनिंगच्या टीममध्ये सहभागी होते. उपग्रह पाठविण्यासाठी १४०० ते १६०० दरम्यान व्होल्टची ऊर्जा लागते. सोलार पॅनलवरून हाय व्होल्ट मिळण्यासाठी त्यांच्या चमूने काम केले. आर्यभट्टनंतर रोहिणी, भास्कर या उपग्रहावर काम करण्याची संधी मिळाल्याचे गणगे यांनी सांगितले.

सॅटेलाईट कमांड पाठवली
आर्यभट्ट उपग्रह निर्मितीच्या टेलीकमांड ग्रुपमध्ये लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील भोकरंबा गावातील शास्त्रज्ञ भाऊसाहेब हाके पाटील यांचा समावेश होता. त्यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९७३ साली इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलीकम्युनिकेशनमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर ‘इस्रो’त रुजू झाले. त्यांच्या ग्रुपने सॅटेलाईटला कमांड पाठविण्याचे काम केल्याची माहिती हाके पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Two scientist from Marathwada contributed to launching India's fisrt satellite 'Aryabhatta' into space; Honored by 'ISRO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.