दोन शाळांची मान्यता रद्द

By Admin | Updated: June 18, 2016 01:02 IST2016-06-18T00:02:15+5:302016-06-18T01:02:34+5:30

औरंगाबाद : ‘आरटीई’ अंतर्गत काही शाळांनी शिक्षण विभागाचीच दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षण विभागाला कसलीही पूर्वकल्पना न देता दोन शाळांनी परस्पर अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे.

Two schools have been canceled | दोन शाळांची मान्यता रद्द

दोन शाळांची मान्यता रद्द

औरंगाबाद : ‘आरटीई’ अंतर्गत काही शाळांनी शिक्षण विभागाचीच दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षण विभागाला कसलीही पूर्वकल्पना न देता दोन शाळांनी परस्पर अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे. विशेष म्हणजे २५ टक्के प्रवेश प्रक्रियेमध्येदेखील या दोन शाळांनी ज्या ठिकाणासाठी शासनाची मान्यता घेतली होती, तेच ठिकाण नोंदविले; पण प्रत्यक्षात त्या दोन्ही शाळा दुसऱ्याच ठिकाणी सुरू असल्यामुळे प्रवेशित पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, उद्या शनिवारी या दोन्ही शाळांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया शिक्षण विभाग पूर्ण करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिली.
२५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी शाळांना आॅनलाईन नोंदणी करण्याची मुदत ठरवून दिलेली होती. त्यावेळी काही शाळांनी शासन मान्यता मिळालेला परिसरच आॅनलाईनमध्ये दर्शविला होता. त्यानंतर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पाल्यांच्या पालकांसाठी नोंदणी झाली. त्यानंतर सोडत पद्धतीने प्रवेश जाहीर करण्यात आले. त्यानुसार पालक आपल्या पाल्यांसाठी संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेले तेव्हा दोन शाळा चक्क त्या परिसरात किंवा आजूबाजूच्या परिसरातही नसल्याचे निदर्शनास आले. काही सुज्ञ पालकांनी यासंबंधी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे धाव घेऊन अशा दोन शाळांविरुद्ध तक्रार केली. शिक्षणाधिकारी मोगल यांनी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत तक्रारींची सत्यता पडताळून पाहिली असता दोन शाळांनी शिक्षण विभागाबरोबर पालकांचीही फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
परिणामी, शासनाची मान्यता घेतानाच शिक्षण संस्थांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते की, संबंधित ठिकाणावरच शाळा सुरू केली जावी. मान्यता प्रस्तावाव्यतिरिक्त जर एखाद्या शाळेने अन्यत्र ठिकाणी शाळा सुरू केली, तर संबंधित शाळेची मान्यता आपोआप संपुष्टात येईल. याचा आधार घेऊन उद्या शनिवारी दोन शाळांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे शिक्षणाधिकारी मोगल यांनी सांगितले.

Web Title: Two schools have been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.