पावसाचे दोन नक्षत्र कोरडेठाक
By Admin | Updated: July 7, 2014 00:19 IST2014-07-07T00:15:08+5:302014-07-07T00:19:13+5:30
येलदरी : मृग व आर्द्रा ही दोन्ही नक्षत्र कोरडेठाक गेल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे़

पावसाचे दोन नक्षत्र कोरडेठाक
येलदरी : मृग व आर्द्रा ही दोन्ही नक्षत्र कोरडेठाक गेल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे़
केरळात मान्सून दाखल झाला़ अशी माहिती हवामान खात्याने दिली खरी़ मात्र राज्यासह परभणी जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पावसाळा सुरू झाल्यानंतर रोहिणी नक्षत्रात हमखास पाऊस पडतो़ त्यामुळे नांगरणी केलेल्या शेत जमिनीस पाळ्या देणे सोपे जाते़ मात्र रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्र लागले तरीही पावसाने पाठ फिरवली़ त्यातच आर्द्रा नक्षत्रही कोरडेठाक गेल्याने शेतातील पाळ्या खोळंबल्या आहेत़ तसेच जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाने हजेरी लावली नाही़ त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत़
आणखी आठ-दहा दिवस पाऊस न पडल्यास खरीपाची पेरणी करणे अवघड होणार आहे़ त्यामुळे बळीराजावर मोठे संकटच कोसळले आहे़ त्यातच धरणाची पाणीपातळी खालावू लागल्याने ग्रामीण भागातील हातपंप, विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत़
त्यामुळे पाणीटंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत़ ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती़, ती पिकेही उन्हामुळे सुकू लागली आहेत़ त्यामुळे शेतकरी चारही बाजुंनी संकटात सापडला आहे़ प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे़ (वार्ताहर)
बाजारपेठेत शुकशुकाट
पाऊस पडत नसल्याने जिंतूर व येलदरी येथील बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे़ कृषी दुकानदार ग्राहकांची वाट पाहत आहेत़ तसेच भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत़
आकाशामध्ये दररोज काळे ढग जमा होत आहेत़ परंतु, पाऊस पडत नाही़ आभाळ आल्यानंतर शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत़ पावसाळ्याचा जून महिना उलटला तरीही पाऊस न पडल्याने येलदरी धरणात केवळ ४० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ या पाण्याचा उपयोग काटकसरीने होणे गरजेचे आहे़ मात्र याकडे संबंधित विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे़
जिंतूर तालुका हा डोंगराळ भाग असल्याने बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे़ पावसाच्या पाण्यावरच शेतकरी पिकाची पेरणी करतात़ यंदा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणीच केली नाही़ ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी हळद, कापूस, सोयाबीन आदी पिकांची लागवड केली आहे़ कडक ऊन पडत असल्याने ही पिकेही जळू लागली आहेत़ तसेच हातपंप व विहिरीची पाणीपातळी कमी झाल्याने ही पिके कशी जगवावीत, या विवंचेनेत शेतकरी दिसून येत आहे़ प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे़