दोन पॅसेंजर रेल्वे मनमाडपर्यंत न जाता केवळ नगरसोल स्टेशनपर्यंतच धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 19:36 IST2020-01-08T19:33:45+5:302020-01-08T19:36:20+5:30
राज्यराणी एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तारीकरणाखाली बदल

दोन पॅसेंजर रेल्वे मनमाडपर्यंत न जाता केवळ नगरसोल स्टेशनपर्यंतच धावणार
औरंगाबाद : मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस १० जानेवारीपासून नांदेडहून धावणार आहे. प्रवाशांची अनेक महिन्यांची मागणी पूर्ण करताना रेल्वे प्रशासनाने नांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर यापुढे फक्त नगरसोलपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रेल्वे बोर्डाने मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसच्या नांदेडपर्यंतच्या विस्तारीकरणाला हिरवा कंदिल दिला आहे. मुंबईसाठी प्रवाशांना नवीन रेल्वे मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत असताना रेल्वेचा अजब निर्णय समोर आला आहे. नांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर या दोन रेल्वे धावतात. मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी या दोन्ही रेल्वे महत्त्वपूर्ण ठरतात. राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली या दोन्ही रेल्वे आता केवळ नगरसोलपर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यावर कायम अन्याय केला जात असल्याची ओरड होते. एक रेल्वे देताना दोन रेल्वेच्या सध्याच्या कनेक्टिव्हिटीत घट केली जात आहे. त्यामुळे रेल्वेकडून होणारा अन्याय दिसून येत असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. या दोन्ही रेल्वोंना मनमाडपासून दूर करण्यास विरोध केला जाणार असल्याचे रेल्वे संघटनांनी सांगितले. मनमाड येथे रेल्वेंची अधिक गर्दी असल्याच्या नावाखाली या रेल्वे नगरसोलपर्यंतच राहतील. यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केला जात होता. राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणानिमित्त हा प्रयत्न पूर्णत्वास नेला जात असल्याचे रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मनमाडपर्यंत कायम राहाव्या पॅसेंजर
नांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर या दोन्ही रेल्वे मनमाडपर्यंत धावल्या पाहिजेत. या रेल्वे केवळ नगरसोलपर्यंत चालविण्यास विरोध केला जाईल, असे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले.