कंपनी विक्रीत उद्योजकाची १४ कोटींची फसवणूक करणारे अकोल्यातील धनदांडगे अटकेत
By सुमित डोळे | Updated: June 29, 2023 20:33 IST2023-06-29T20:32:11+5:302023-06-29T20:33:14+5:30
आरोपींनी कंपनी हस्तांतरण करताना महत्त्वाचे व्यवहार, देयके लपवून कोटींची फसवणूक केली.

कंपनी विक्रीत उद्योजकाची १४ कोटींची फसवणूक करणारे अकोल्यातील धनदांडगे अटकेत
छत्रपती संभाजीनगर : कोरोना काळात कंपनी तोट्यात आल्याचे सांगून ७० कोटी रुपयांची कंपनी तिघांनी अवघ्या ४१ कोटीत शहरातील उद्योजकाला विकण्याचा बनाव रचला. त्यानंतर त्यांनाच देयके व इतर बाबी लपवून पैसे उकळत तब्बल १४ कोटी ८२ लाख ६८ हजार रुपयांना फसवले. विशेष म्हणजे, कंपनी विकत घेण्याची तयारी दाखवलेल्या उद्योजकाला फसवून त्यांच्यावर ७० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या अकोल्याच्या धनदांडग्यांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे. नितीन हरिदास पाटील व संदीप हरिभाऊ पुंडकर असे त्यांची नावे असून नितीन हरिदास पाटील हा फरार झाला आहे.
संजय त्रिलोकचंद गोयल (अग्रवाल), रा. एन-१) यांची ऋषी फायबर्स प्रा. लि. कंपनी आहे. यात जिनिंग प्रोसेस तसेच कापसाच्या संबंधीचे व्यवहार चालतात. जानेवारी, २०२१ मध्ये अकोल्याचा एजंट अनिल थानवीच्या मार्फत अकोल्यात लॉकडाऊनमध्ये संकटात आलेली जे. जे. फाईन स्पा कंपनी विकण्यास असल्याचे कळाले. गोयल यांनी मे महिन्यात कंपनीचे संचालक नितीन, संजय व संदीप यांची भेट घेऊन कंपनी ४१ कोटी २५ लाखात हस्तांतरित करण्याचे ठरवले. पाटीलच्या विनंतीवरून गोयल यांनी त्यांना ७ कोटी १४ लाख ५१ हजार रुपये देऊ करत त्यांची ६ कोटी ७२ लाखांचे कर्ज निरंक केले. शिवाय काही देयक देखील दिले. परंतु आरोपींनी कंपनी हस्तांतरण करताना महत्त्वाचे व्यवहार, देयके लपवून कोटींची फसवणूक केली.
उलट गोयल यांच्यावरच गुन्हा दाखल
आरोपी अकोला, अमरावतीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील बडे प्रस्त आहे. पुंडकरचे भाऊ गेल्या विधानसभेत अवघ्या ३ हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यांनी गोयल यांच्यावरच ७० कोटींच्या फसवणुकीचा आळ घेत गुन्हा दाखल केला. गोयल यांच्या तक्रारीनंतर पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या आदेशावरून निरीक्षक गौतम पातारे यांनी यात गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक आत्माराम घुगे, सचिन जाधव, प्रकाश सोनवणे, बापुराव बावस्कर, संतोष गायकवाड, अरविंद पुरी यांच्या पथकाने गुप्तता पाळून तत्काळ रवाना होत दोघांना अटक केली. त्यांना अटक केल्याचे कळताच पाटील मात्र फरार झाला. दोघांना न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पातारे यांनी सांगितले.